छत्तीसगडमधील सुरगुजा जिल्ह्यातील भाजपा आमदाराच्या भावाने गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी सायंकाळी लखनपूर पोलीस ठाण्यात अंबिकापूरचे भाजपा आमदार राजेश अग्रवाल यांचे मोठे भाऊ विजय अग्रवाल यांच्यासह अन्य भाजपा कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घातला आणि याप्रकरणी स्थानिक डीएसपीचीही बदली करण्यात आली आहे.
भाजपा आमदाराचा मोठा भाऊ विजय अग्रवाल यांचा ट्रेनी डीएसपीसोबत जोरदार वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे. वास्तविक हे संपूर्ण प्रकरण एका दरोड्याशी संबंधित आहे. दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी ग्रामपंचायत चिलबील, अमेरा आणि पूहपटरा येथील चार तरुणांना दरोड्याच्या गुन्ह्यात जेलमध्ये पाठवलं होतं. याच्या निषेधार्थ आज ग्रामपंचायत चिलबील, अमेरा व पूहपटरा ग्रामस्थांनी एकत्र येऊन लखनपूर पोलीस ठाण्याला घेराव घातला.
पोलीस अधिकाऱ्यांनी त्यानंतर गावकऱ्यांना शांत करून माघारी पाठवले, मात्र याच दरम्यान अंबिकापूरचे आमदार राजेश अग्रवाल यांचे भाऊ बंधू विजय अग्रवाल यांनी या प्रकरणावर राजकारण करत आपल्या समर्थक व नातेवाईकांसह लखनपूर पोलीस ठाणे गाठून गोंधळ घातला. पोलीस स्टेशनमध्य़े दादागिरी केली.
पोलीस ठाण्यातील ट्रेनी डीएसपी शुभम तिवारी यांनी विजय अग्रवाल आणि त्यांच्या समर्थकांना शांततेने बोलण्यास सांगितलं. असं सांगितलं जात आहे की विजय अग्रवाल यांनी रागाच्या भरात ट्रेनी डीएसपीसोबत वाद घातला. यानंतर ट्रेनी डीएसपीची बदली करण्यात आली आहे.