अहमदाबाद : गुजरात विधानसभेत बुधवारी सत्ताधारी भाजपा आणि विरोधी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्यानंतर काँग्रेसच्या दोन आमदारांना दिवसभरासाठी तर एकाला संपूर्ण अधिवेशनासाठी करण्यात आले.काँग्रेसचे सदस्य अमरीश डेर यांनी भाजपाच्या जगदीश पांचाळ यांच्यावर मायक्रोफोनच्या रॉडने हल्ला केला व बुक्केही मारले. हे पाहून भाजपच्या सदस्यांनी अमरीश डेर यांच्यावर हल्ला केला. विधानसभाध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी काँग्रेसचे विक्रम मादम यांना बोलण्यापासून थांबविल्यामुळे सभागृहात गोंधळाला सुरुवात झाली. मात्र, मादम यांनी मी बोलेनच असा आग्रह धरला आणि मादम यांना बोलू द्यावे, असे डेर ओरडून सांगू लागले.अध्यक्षांनी डेर यांच्या बोलण्याच्या पद्धतीला आक्षेप घेताच मादम व डेर निषेध करण्यासाठी अध्यक्षांच्या आसनासमोर धावले. त्यावर त्रिवेदी यांनी मादम व डेर यांना दिवसभरासाठी निलंबित करून त्यांना सभागृहाबाहेर काढले. यामुळे संतापलेल्या काँग्रेसच्या प्रताप दुधाट संतापले यांनी जगदीश पांचाळ यांच्यावर मायक्रोफोनच्या रॉडने हल्ला केला.त्यामुळे अध्यक्षांनी दुधाट यांना अर्थसंकल्पाच्या उर्वरीत कालावधीसाठी निलंबित करून, कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले, पण डेर मागच्या दाराने सभागृहात आले व त्यांनी पांचाळ यांच्यावर पुन्हा हल्ला केला. त्या वेळी तेथे पांचाळ यांना वाचविण्यासाठी भाजपाचे सदस्य धावले आणि त्यांनीही अमरीश डेर यांच्यावर हल्ला केला.>भाजपा आमदारावर धक्काबुक्कीचा गुन्हाफिरोजाबाद (उत्तर प्रदेश) : ग्राम पंचायत सचिवाला धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून भाजपचे जसरानाचे आमदार रामगोपाल उर्फ पप्पू लोधी व त्यांच्या बंदुकधारी अंगरक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला. ग्रामसचिव रामचंद्र यांनी तक्रारीत म्हटले आहे की, लोधी यांनी मला मंगळवारी फोन करून बोलावले.मी दुसरीकडे काम करीत असल्याने, त्यांनीच तिथे यावे, अशी विनंती मी केली. लोधी यांनी व त्यांच्या अंगरक्षकाने तिथे येताच, शिव्या देत मला धक्काबुक्की केली. जिल्हादंडाधिकाऱ्यांनी सांगितले की. रामचंद्र यांच्या तक्रारीनंतर आमदारांच्या अंगरक्षकाला पुन्हा पोलीस सेवेत पाठवले असून लोधी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
राडा! काँग्रेसच्या आमदारांची भाजपाच्या नेत्याला विधानसभेत माईकने मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2018 1:18 PM