श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील भाजपा-पीडीपी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदी राहिलेले भाजपा नेते चौधरी लाल सिंह यांनी पत्रकारांना धमकी दिली आहे. राज्यातील पत्रकारांनी स्वत:साठी एक मर्यादारेषा आखून घ्यावी. शुजात बुखारी यांचं काय झालं हे सर्वांच्या लक्षात आहेत ना?, असं म्हणत सिंह यांनी पत्रकारांना इशारा दिला. बुखारी यांची गेल्या आठवड्यात दहशतवाद्यांनी श्रीनगरमध्ये गोळ्या झाडून हत्या केली. जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीविषयी भाजपा नेते चौधरी लाल सिंह यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'काश्मीरचे पत्रकार जम्मूतील परिस्थिती चुकीच्या पद्धतीनं जनतेसमोर मांडत आहेत. काश्मीरमधील पत्रकारांनी याठिकाणी चुकीचं वातावरण तयार केलं आहे. त्यांना इकडे कशी परिस्थिती हवी आहे? शुजात बुखारी यांचं काय झालं तुम्हाला माहित आहे ना?' असं म्हणत सिंह यांनी पत्रकारांना धमकी दिली. 'पत्रकारांनी मर्यादा पाळल्यास राज्यातील बंधुभाव कायम राहिल. राज्याची प्रगती होईल,' असंही सिंह म्हणाले. याआधी सिंह यांनी कठुआ बलात्कार प्रकरणाविषयी वादग्रस्त विधान केलं होतं. श्रीनगरमध्ये 14 जून रोजी पत्रकार वसाहतीजवळ शुजात बुखारी यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. बुखारी स्थानिक वृत्तपत्र रायझिंग काश्मीरचे संपादक होते. रात्रीच्या वेळी ही घटना घडली. याआधी याच दिवशी जम्मू-काश्मीरमध्ये औरंगजेब या जवानाचं अपहरण करण्यात आलं. या जवानाची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनांमुळे काश्मीरमधील परिस्थिती बिघडली असताना 19 जून रोजी भाजपानं जम्मू-काश्मीर सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
'बुखारींचं काय झालं लक्षात आहे ना?'; भाजपा आमदाराची पत्रकारांना धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2018 7:08 PM