नवी दिल्ली - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच भाजपाच्या एका आमदाराने वादग्रस्त विधान केलं आहे. उत्तर प्रदेशमधील भाजप आमदार महेश त्रिवेदी (BJP Mahesh Trivedi) हे सध्या चर्चेत आले आहेत. त्यांचा एक वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. यामध्ये ते विरोधकांना थेट धमकी देत असल्याने राजकारण त्रिवेदी यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता करण्यात येत आहे.
भाजपाचे कानपूरमधील किडवाई नगर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार व आमदार महेश त्रिवेदी हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्रिवेदी यांच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. महेश त्रिवेदी हे आपल्या भाषणात विरोधकांना धमकावत आहेत 'जे लोक बळाचा दुरुपयोग करतील त्यांना जशास तसे उत्तर द्या. त्यांच्यावर लाठ्या-काठ्या चालवा. त्यांना चपलांनी मारा. हे करताना फक्त गोळी चालवू नका मग बाकीची चिंता तुम्ही करण्याचे कारण नाही. ते माझ्यावर सोडा. पुढे काय होईल ते मी पाहून घेईन', असे त्रिवेदी हे भाजप कार्यकर्त्यांना सांगत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
समाजवादी पक्षाने यावर जोरदार आक्षेप घेतला आहे. समाजवादी पक्षाच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून निवडणूक आयोगाचे लक्ष वेधण्यात आले आहे. विरोधी पक्षातील लोकांवर हल्ले करण्यासाठी भाजपचा आमदार उघडपणे कार्यकर्त्यांना चिथावणी देत आहे. हाच भाजपचा खरा चेहरा असून याची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने संबंधित आमदारावर कारवाई करावी, अशी मागणी समाजवादी पक्षाकडून करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.