भोपाळ : केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारित कायद्याला देशभरातून विरोध होत आहे. तर आतापर्यंत देशातील चार राज्यांच्या विधानसभेत सुद्धा या कायद्याच्या विरोधात प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षांनी या कायद्याचा कडाडून विरोध केला आहे.तर आता भाजपचे आमदार सुद्धा या कायद्याला विरोध करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
एनडीटीव्हीने या विषयी बातमी देताना म्हंटले आहे की, मध्यप्रदेशमधील मैहर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार नारायण त्रिपाठी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यास विरोध दर्शविला आहे. तर धर्माच्या नावाखाली देशाचे विभाजन होऊ नये असेही ते म्हणाले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मी ग्रामीण भागातून आलो आहे. आजही ग्रामीण भागात साधा आधार कार्ड बनत नसेल तर, तेथील लोकं इतर कागदपत्र कुठून आणणार असा सवाल ही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, ग्रामीण भागातील दोन समाजातील लोकं एकमेकांकडे पाहत सुद्धा नसल्याचे आमदार त्रिपाठी म्हणाले. तर तुम्ही पक्षाच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन भूमिका मांडत असल्याचे त्यांना विचारले असता, हा माझ्या हृदयाचा आवाज असल्याचे त्यांनी यावेळी उत्तर दिले.