भोपाळ- मध्य प्रदेशमधील गुनाचे भाजपा आमदार पन्नालाल शाक्य यांचं एक वादग्रस्त विधान सध्या चर्चेचा विषय आहे. 'समाजात विकृती निर्माण करणाऱ्या मुलांना जन्म देण्यापेक्षा महिलांनी विनापत्य रहावं. जी मुलं संस्कारी नसतील अशांना जन्म देऊन काहीच उपयोग नाही, असं वादग्रस्त विधान पन्नालाल शाक्य यांनी केलं आहे. महिलांनी संस्कारी मुलांनाच जन्म द्यावा, असा सल्ला देतानाच काँग्रेसच्या काळात चुकीचे धोरण आखणारे नेते जन्माला आले. अशा नेत्यांना शेवटी कोणत्या तरी महिलेनेच जन्म दिला असेल, असंही विधान त्यांनी केलं.
नगरपालिका परिसरात आयोजीत एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. या कार्यक्रमात महिलांची संख्या जास्त असतानाही त्यांनी हे बेताल विधान केलं. महिलांनी फक्त संस्कारी मुलांनाच जन्म द्यावा. कारण काँग्रेसच्या काळात फक्त चुकीचे धोरण आखणाऱ्या नेत्यांचा जन्म झाला. शेवटी या नेत्यांनाही कोणत्या तरी महिलेनेच जन्म दिला, असं ते म्हणाले. समाजात विकृती निर्माण करणारे आणि दुर्गूण असलेल्या मुलांना महिलांनी जन्मच देऊ नये. अशी मुलं मोठी होऊ देश आणि समाजाला भ्रष्ट करतात, असं त्यांनी म्हटलं. काँग्रेसने पूर्वी गरीबी हटाव, असा नारा दिला. पण देशातील गरीबी कमी झाली नाही, अशी टीका त्यांनी केली.
शाक्य यांनी काही महिन्यांपूर्वी टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीवर टीका केली होती. विराटने इटलीमध्ये लग्न केल्यामुळे शाक्य यांनी विराटच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. इतकंच नाही, तर बलात्काराच्या वाढत्या घटनांवरही त्यांनी धक्कादायक विधान केलं होतं. मुलींनी बॉयफ्रेण्ड बनवणं बंद केलं तर त्यांच्यावरील अत्याचार कमी होतील, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.