नवी दिल्ली – आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमी चर्चेत असणारे राजा सिंह लोध पुन्हा एकदा चर्चेत आलेत. रविवारी राजा सिंह यांनी जे गाणं भारतीय लष्करांसाठी गायलं आहे ते गाणं पाकिस्तानी गाण्याची नक्कल आहे असा दावा पाकिस्तानी लष्कराकडून करण्यात आला आहे. मात्र आपण कोणाचंही गाणं चोरी केलं नसल्याचं राजा सिंह यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तेलंगणा येथील गोशामहल विधानसभा मतदारसंघातील आमदार राजा सिह लोध यांनी श्रीरामनवमी दिवशी आपणं एक गाणं लॉन्च करणार असल्याचं सांगितले. हे गाणं भारतीय लष्कराला समर्पित असल्याचं राजा सिंह यांच्याकडून सांगण्यात आलं. राजा सिंह यांनी गाणं लॉन्च केल्यानंतर एक नवीन वाद निर्माण झाला. पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने भाजपा आमदाराची खिल्ली उडवत खरं बोलण्यातही पाकिस्तानची नक्कल भारताने करावी अशी कुरघोडी केली.
पाकिस्तानच्या सेनेच्या या दाव्यावर भाजपा आमदार राजा सिंह यांनीही मी कोणत्याही दहशतवादी देशाच्या गाण्याची नक्कल केली नसल्याचं सांगितले आहे. मला चांगलं वाटलं की, माझ्या हिंदुस्तान जिंदाबाद या गाण्याला पाकिस्तानी मिडीयाही कव्हर करतंय असं ट्विट राजा सिंह यांनी केलं.
पाकिस्तानी सेनेकडून ट्विट करुन सांगण्यात आलं होतं की, भारतातील एका आमदाराने पाकिस्तानी गाण्याची नक्कल करत त्यात थोडे बदल करुन भारतीय लष्कराला हे गाणं समर्पित केलं. मिडीया रिपोर्टनुसार या गाण्यात जिंदाबाद पाकिस्तान ऐवजी जिंदाबाद हिंदुस्तान करण्यात आलं आहे. त्याचसोबत गाण्यातील शब्दांमध्ये थोडे बदलही करण्यात आलेले आहेत.
पाकिस्तानी मिडीयानुसार सोशल मिडीयावर व्हायरल होणारं हे गाणं पाकिस्तानी गाण्याचा भाग आहे. हे गाणं पाकिस्तान दिनाच्या कार्यक्रमात 23 मार्च रोजी पाकिस्तानी सेनेच्या प्रवक्त्यांकडून जारी करण्यात आलं होतं. हे गाणं साहिर अली बग्गा यांनी लिहिलं होतं असा दावा पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. भाजपा आमदार राजा सिंह लोध यांच्यावर या आधीही अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. राजा सिंह लोध यांच्यावर 60 पेक्षा अधिक गुन्हे नोंद आहेत. ज्यामध्ये सर्वाधिक जास्त भडकाऊ भाषण देणे हा गुन्हा नोंद आहे.