हैदराबाद - नुपूर शर्मा यांच्यानंतर आता तेलंगाणामधील भाजपा आमदार टी राजा सिंह यांनी मोहम्मद पैगंबरांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राजा सिंह यांच्याविरोधात अनेक ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या आहेत. एवढंच नाही तर दबीरपुरा, भवानीनगर, रेनबाजार, मिरचौक पोलीस ठाण्यांमध्ये राजा सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. तसेच संसप्त लोकांनी राजा सिंह यांच्याविरोधात आंदोलनही केले.
आमदार राजा सिंह यांच्याविरोधा आंदोलन करणाऱ्या लोकांनी सांगितले की, त्यांनी एका समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे आमदाराविरोधात तीव्र आक्रोश व्यक्त केला जात आहे. तसेच त्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली जात आहे. राजा सिंह यांनी हल्लीच एक व्हिडीओ अपलोड केला होता. यामध्ये त्यांनी मोहम्मद पैगंबरांबाबत वादग्रस्त विधान केले होते.
मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री पोलीस कमिश्नन सी.व्ही. आनंद यांचे कार्यालय आणि शहराच्या इतर भागांमध्ये आंदोलन सुरू झाले. या व्हिडीओमध्ये राजा सिंह हे कॉमेडियन मुनव्वर फारुखी आणि त्याच्या आईबाबतही टिप्पणी करताना दिसत आहेत. त्यामुळे संतप्त लोकांनी आंदोलन करत त्यांच्या अटकेची मागणी केली.
टी. राजा सिंह हे हैदराबादमधील गोशामहल मतदारसंघातील आमदार आहेत. यापूर्वी त्यांनी कॉमेडियन मुनव्वर फारुकी यांनाही धमकी दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी त्यांना हैदराबाद पोलिसांनी ताब्यात घेतले होते.