बंगळुरू - कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांच्यावर भाजपा आमदार राजू कागे यांनी वादग्रस्त विधान केलेलं आहे. जर कुमारस्वामी यांनी शंभर वेळा आंघोळ केली तरी ते रेड्यासारखेच दिसणार अशी वादग्रस्त टीका भाजपा आमदार राजू कागे यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर केली आहे. काही दिवसांपूर्वी कुमारस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना राजू कागे यांनी हे वक्तव्य केलं आहे.
कर्नाटकच्या कागवाड विधानसभा मतदारसंघातील राजू कागे हे भाजपाचे आमदार आहेत. राजू कागे यावेळी बोलले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी गोरे आहेत आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी काळे आहेत. जर कुमारस्वामी यांनी १०० वेळा आंघोळ केली तर ते रेड्यासारखे काळेच दिसणार आहेत असं वादग्रस्त विधान कागे यांनी केले. मात्र राजू कागे यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापू लागले आहे. राजू कागे यांनी केलेलं वक्तव्य वर्णभेदावर भाष्य असल्याने कागे यांच्यावर कारवाईही होऊ शकते.
मंगळवारी एचडी कुमारस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. कुमारस्वामी म्हणाले होते की, मोदी रोज सकाळी उठतात आणि चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी मेकअप करतात. नंतर कॅमेरेच्या समोर येतात. कारण मिडीया फक्त नरेंद्र मोदी यांना दाखवतं तर दुसरीकडे आम्ही दिवसातून सकाळी एकदा आंघोळ करतो त्यानंतर दुसऱ्याच दिवशी चेहरा धुतो. त्यामुळेच कॅमेरांना आमचे चेहरे चांगले दिसत नाही. आमचे पत्रकार मित्रही आमचा चेहरा बघत नाहीत असा चिमटा कुमारस्वामी यांनी काढला होता. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसभरात १० वेळा पावडर लावतात आणि १० वेळा कपडे बदलतात. भाजपाचे उमेदवारही मतं मागताना स्वत:चा चेहरा न दाखवता मोदींच्या चेहऱ्याकडे बघून मतं मागतात असा टोला कुमारस्वामी यांनी भाजपाला लगावला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये राजकीय नेते भाषणातून एकमेकांचे कपडे उतरविण्याची भाषा करतात. एकमेकांवर व्यक्तिगत स्वरुपात टीका करताना पाहायला मिळतात. मात्र अशा विधानांमुळे देशाच्या विकासाचे मुद्दे कुठेतरी मागे पडतात हे लोकशाहीसाठी घातक आहे.