सिंगरौली: संपूर्ण देशात लोकसंख्या नियंत्रण कायद्यावरून चर्चा सुरू आहे. मध्य प्रदेशातील भारतीय जनता पक्षाचे नेते या कायद्याचं समर्थन करत आहेत. सिंगरोली जिल्ह्याचे भाजप आमदार रामलल्लू वैश्य यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये वैश्य लोकसंख्या नियंत्रण कायद्याचं महत्त्व सांगत आहेत. विशेष म्हणजे वैश्य यांना नऊ मुलं आहेत. याबद्दल विचारलं असता ही मुलं देवाच्या इच्छेनं झाल्याचं त्यांनी सांगितलं.
मला १९९० नंतर मूल झालं नाही. मी आता ७८ वर्षांचा आहे. देवाच्या इच्छेनं हे सगळं झाल्याचं आमदार रामलल्लू वैश्य यांनी सांगितलं. आज लोकसंख्या नियंत्रण कायदा आल्यास तो सर्वांना लागू होईल, असंदेखील त्यांनी पुढे सांगितलं. रामलल्लू वैश्य सिंगरौली मतदारसंघातून तीनदा निवडून आले आहेत. 'तुम्ही केवळ हिंदूंवर कायद्याचा बडगा उगाराल आणि मुस्लिमांना मोकळीक द्याल तर लोकसंख्या वाढ थांबेल का? त्यांना थांबवलं असतं, तर आम्हीदेखील थांबलो असतो,' असं वैश्य म्हणाले.
लोक माझं विधान चुकीच्या अर्थानं घेतात, असंदेखील वैश्य यांनी सांगितलं. 'कायदा सर्वांसाठी समान असायला हवा असं मला वाटतं. मग व्यक्ती हिंदू असो मुस्लिम असो शीख असो किंवा मग ख्रिश्चन असो. कायदा सगळ्यांसाठी सारखाच असायला हवा. तुम्हाला ९ मुलं आहेत. तुम्ही काय नियंत्रण ठेवलंत, असा प्रश्न लोक मला विचारतात. मला १९९० नंतर एकही मूल झालं नाही. या गोष्टीला आता ३० वर्ष उलटून गेली आहेत, असं उत्तर मी प्रश्न विचारणाऱ्यांना देतो,' असं वैश्य म्हणाले.