गोरखपूर : जीएसटीमुळे महसुलात घट झाल्याने देशाच्या तिजोरीमध्ये खडखडाट जाणवू लागला आहे. यामुळे केंद्र सरकारने आरबीआयकडून पैसे घेतानाच भारत पेट्रोलियम सारख्या कंपन्याही विकायला काढल्या आहेत. यामुळे पेशाने डॉक्टर असलेल्या गोरखपूरच्या भाजपा आमदाराने होमिओपथिक औषधच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना सुचविले आहे. त्यांनी फेसबुकवर हा उपाय पोस्ट केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा संपविण्याची मोहिम उघडली होती. 2014 लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी आघाडी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना स्विस बँकांमधील काळा पैसा भारतात आणून प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख रुपये टाकण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर दोन वर्षांनी नोटाबंदी केली होती. आता हे दोन्ही प्रयत्न फोल ठरले आहेत. त्यातच वर्षभरानंतर जीएसटी लागू केल्याने भारतीय अर्थव्यस्थेचे कंबरडे मोडल्याचा आरोप विरोधक करत आहेत. देशातील आर्थिक मंदीवर केंद्र सरकारला उपाय सापडत नसताना गोरखपूरचे भाजपा आमदार डॉ. राधा मोहन दास अग्रवाल यांनी आयकरच बंद करण्याचा उपाय सुचविला आहे.
आज आर्थिक मंदीचे मूळ कारण मागणीत घट झाली हे आहे. बाजारात खरेदीची संख्या जोपर्यंत वाढत नाही, उत्पादक माल कोणासाठी बनविणार? तो त्याचे पैसे माल बनविण्याऐवजी शेअर बाजारात गुंतवेल, आणि हेच झाले आहे. आम्ही जेवढे पैसे त्यांना मदतीसाठी दिले ते त्यांनी उत्पादन वाढविण्यासाठी वापरलेच नाहीत. कारण त्यांचा जुनाच माल विकला गेलेला नाही. जेव्हा लोकांच्या मनातून दोन नंबरचा पैसा पाप असतो, याचे ओझे संपून जाईल तेव्हा ते पैसे बँकेत ठेवतील किंवा त्यांचे जिवनमान सुधारण्यासाठी वस्तू खरेदी करतील. त्यांच्याकडे पैसा आहे पण तो 1 नंबरचा नाहीय, अशी पोस्ट त्यांनी केली आहे.
हे सांगताना त्यांनी अर्थमंत्र्यांना नाराज होऊ नकात, अशी विनंतीही केली आहे. जेव्हा दोन नंबरचा पैसा संपेल तेव्हा विक्री वाढल्याने उद्योजक अधिक माल उत्पादन करतील. यामुळे आयकरच रद्द करावा, असे दास यांनी म्हटले आहे.
डॉ. राधा मोहन दास अग्रवाल हे उत्तर प्रदेश विधानसभेत भाजपालाच, सरकारी अधिकाऱ्यांनाच कधी कधी अडचणीत आणतात. गोरखपूरमध्ये भूमिगत वीजतारा टाकण्यातील भ्रष्टाचार उकरून काढत त्यांनी भाजपाच्या आमदाराची कंपनी काळ्या यादीत टाकायला लावली होती.