आमदाराच्या मुलाची दादागिरी; मंदिराचे दरवाजे उघडायला विरोध केल्याने पुजाऱ्याच्या मुलाला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 18:24 IST2025-04-13T18:24:23+5:302025-04-13T18:24:53+5:30
मध्य प्रदेशात भाजप आमदाराच्या मुलाने पुजाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

आमदाराच्या मुलाची दादागिरी; मंदिराचे दरवाजे उघडायला विरोध केल्याने पुजाऱ्याच्या मुलाला मारहाण
Madhya Pradesh Crime:मध्य प्रदेशात भाजप आमदाराच्या मुलाने मुजोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. मध्यरात्री मंदिरात दर्शनाला विरोध केल्यानंतर भाजप आमदाराने पुजाऱ्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजप आमदाराच्या मुलाने मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातील चामुंडा देवी मंदिराच्या पुजाऱ्यावर हल्ला केला. आमदाराचा मुलगा त्याच्या मित्रांसह मध्यरात्री दर्शनासाठी आला होता. मात्र मंदिराचे दार उघडण्यावरून त्याच्या साथीदारांचा पुजाऱ्याच्या मुलाशी वाद झाला. यानंतर हा सगळा प्रकार घडला.
भाजप आमदार गोलू शुक्ला यांचा मुलगा रुद्राक्ष शुक्ला याच्यावर देवासमधील चामुंडा देवी मंदिराच्या पुजाऱ्यावर हल्ला केल्याचा आणि धमकी दिल्याचा आरोप आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. रुद्राक्ष त्याच्या मित्रांसह माता टेकरी मंदिरात पोहोचला आणि मंदिराचे दरवाजे उघडण्यासाठी पुजाऱ्यावर दबाव आणू लागला. पुजाऱ्याने यासाठी नकार दिला असता त्याच्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत.
शुक्रवारी रात्री १२.४० वाजता इंदूरचे आमदार गोलू शुक्ला यांचा मुलगा रुद्राक्ष शुक्ला १० ते १२ लाल दिव्याच्या वाहनांच्या ताफ्यासह मंदिरात पोहोचला. मंदिर बंद असतानाही त्यांनी पुजाऱ्याच्या मुलाला जबरदस्तीने गेट उघडण्यास सांगितले. यानंतर, पुजाऱ्याचा मुलगा उपदेश याने नियमांचे कारण देत गेट उघडण्यास नकार दिला. यावर रुद्र शुक्लाचा मित्र जितेंद्र रघुवंशी याने उपदेशला शिवीगाळ करून मारहाण केली. पुजारी महेश यांनी आरोप केला की त्यांच्या मुलाला गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली.
दुसऱ्या दिवशी पुजारी महेश यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी जितेंद्र रघुवंशी याच्याविरुद्ध बीएनएस कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल केला. एफआयआरमध्ये फक्त जितेंद्रचे नाव आहे. भाजप आमदाराचा मुलगा रुद्र शुक्ला यांचे नाव त्यात नाही. तक्रार दाखल केल्यानंतर लगेचच मला एक फोन आला आणि प्रकरण मिटवण्यास सांगितले. पण मी या प्रकरणात तडजोड करणार नाही, असे पुजाऱ्याने सांगितले.
दरम्यान, रुद्राक्ष शुक्लाने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर मंदिरात दर्शनासाठी जात असल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये डझनभर गाड्या मंदिराकडे जाताना दिसत आहेत. या गाड्यांवर बेकायदेशीर हॉर्नही लावण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जितेंद्र रघुवंशी याच्याविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. पोलीस मंदिराच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज देखील तपासत आहेत.