तिकीट वाटपावरुन मध्य प्रदेशातील निवडणुकीच्या मैदानात राजकारण तापलं आहे. छतरपूर जिल्ह्यातील चंदला मतदारसंघातून भाजपाने आमदार राजेश प्रजापती यांचं तिकीट कापलं आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रजापती यांनी आपल्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष वीडी शर्मा यांच्यावर पैसे घेऊन तिकीट दिल्याचा गंभीर आरोप केला. एवढंच नाही तर ज्या नेत्याला तिकीट दिलं आहे तो गुन्हेगार असून जुगार खेळतो, चुकीचं काम करतो असं राजेश प्रजापती यांचं म्हणणं आहे.
भाजपाचे आमदार राजेश प्रजापती म्हणाले, ज्याने चूक केली त्याला विधानसभेचे तिकीट दिले आहे. अशा नेत्याची बाजू कोण घेणार? सर्वेक्षणात माझंही नाव होतं, मग तिकीट कसं कापलं? आणि असं म्हणताच राजेश प्रजापती मीडियासमोर ढसाढसा रडू लागले. आमदार प्रजापती यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजप नेत्यांची बैठक घेतली. आलम देवी मंदिरात ही बैठक बोलावण्यात आली होती.
"भाजपाने जुगार खेळणाऱ्याला तिकीट दिलं"
चंदलाचे माजी आमदार विजय बहादूर सिंह देखील सहभागी झाले होते. सभेत आमदाराचे तिकीट कापल्याबद्दल समर्थकांनी नाराजी व्यक्त केली.या बैठकीत चंदला यांच्या उमेदवाराला विरोध केल्याची चर्चा झाली. तिकीट नाकारल्यानंतर आमदार राजेश प्रजापती यांनीही भाजपा प्रदेशाध्यक्ष वीडी शर्मा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, भाजपाने जुगार खेळणाऱ्याला तिकीट दिलं आहे.
आमदार रघुनाथ मालवीयही रडले
भारतीय जनता पक्षाने पाचव्या यादीत सिहोर जिल्ह्यातील आष्टा विधानसभेचे विद्यमान आमदार रघुनाथ मालवीय यांचे तिकीट रद्द करून जिल्हा पंचायत अध्यक्ष गोपाल सिंह यांना उमेदवार म्हणून घोषित केले. त्यानंतर गोपाल सिंह यांच्याविरोधात आंदोलन सुरू झाले आहे. रविवारी भाजपाच्या दोन गटांची बैठक झाली. ज्यामध्ये विद्यमान आमदार रघुनाथ मालवीय सहभागी झाले होते. यावेळी त्यांच्या समर्थकांना संबोधित करताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू तरळले. रघुनाथ मालवीय म्हणाले, मी नेहमीच जनतेची सेवा केली आहे. कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. आमदार रडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.