बलिया- वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असणारे भाजपाचे आमदार सुरेंद्र सिंह यांचं आणखी एक वादग्रस्त विधान चर्चेत आलं आहे. भारत माता की जय बोलायला घाबरणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मी पाकिस्तानी मानतो, असं विधान सुरेंद्र सिंह यांनी एका जनसभेदरम्यान केलं. सुरेंद्र सिंह हे उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यातील बैरिया विधानसभेचे आमदार आहेत.
भारत माता की जय बोलायला घाबरणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मी पाकिस्तानी समजतो, असं त्यांनी म्हंटलं. जनसभेदरम्यान स्थानिक खासदार भरत सिंहही उपस्थित असल्याची चर्चा आहे. भाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांनी याआधीही त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याने वाद ओढावून घेतला आहे. भारत एक दिवस हिंदू राष्ट्र होईल. हिंदू संस्कृती मानणारे मुस्लीमच फक्त देशात राहतील, असं विधान त्यांनी केलं होतं. २०२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण होत असून २०२४ मध्ये भारत हिंदू राष्ट्र होईल. मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्याचवेळी भारत हा महाशक्ती झालेला असेल त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाही वाटा असेल, असं त्यांनी म्हंटलं होतं.
सुरेंद्र सिंह यांनी त्यांच्या एका विधानातून पक्षालाही घरचा आहेर दिला होता. उत्तर प्रदेशात फक्त सरकार बदलतं बाकी काही नाही, असं ते म्हणाले होते.