शिमोगा - अवैध वाळू उत्खननाप्रकरणी सुरू असलेल्या वादातून कर्नाटकमधील भाजपा आमदाराने पोलीस ठाण्यासमोर स्वत:ला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. जी. शेखर असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या भाजपा आमदाराचे नाव असून, ते चित्रदुर्ग जिल्ह्यातील होसदुर्ग मतदारसंघातील आमदार आहेत. अवैधपणे उत्खनन केलेली वाळू घेऊन जात असलेले चार ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केले होते. तेव्हापासून या वादाला सुरुवात झाली होती. शेखर यांनी जप्त करण्यात आलेले ट्रॅक्टर सोडवून घेण्यासाठी पोलीस सब इन्स्पेक्टरवर दबाव आणल्याचा आरोप पोलिसांनी एक पत्रक प्रसिद्ध करून केला होता. दरम्यान, पोलिसांनी आमदारांचा दबाव झुगारून लावल्यानंतर ते रात्री 9.30 वाजता पोलीस ठाण्याजवळ आले. तसेच त्यांनी स्वत:वर पेट्रोल ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पेट्रोल त्यांचे डोळे आणि कानात केले. तसेच पेटवून गेल्याने ते काही प्रमाणात भाजले आहेत. त्यांची प्रकृतीस स्थिर आहे. मात्र त्यांना आराम करण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. आमदार जी. शेखर यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानंतर त्यांचे समर्थक संतप्त झाले आहेत. त्यांनी सोमवारी होसदुर्ग येथे आंदोलन केले. तसेच सर्वसामान्य नागरिकांना बांधकामासाठी नदीमधील वाळू पुरवण्यात यावी, अशी मागणी त्यांनी एका पत्रकामधून असिस्टंट कमिशनर यांच्याकडे केली आहे. या प्रकारानंतर कर्नाटक भाजपाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी शेखर यांची भेट घेत त्यांची विचारपूस केली आहे. तर पोलीस हे सर्वसामान्यांना त्रस्त करत असून, भाजपाचे कार्यकर्ते आणि समर्थकांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत, असा आरोप शेखर यांनी केला आहे.
भाजपा आमदाराने पोलीस ठाण्यासमोर केला आत्मदनाचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2019 2:16 PM
भाजपा आमदाराने पोलीस ठाण्यासमोर स्वत:ला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.
ठळक मुद्देकर्नाटकमधील भाजपा आमदाराने पोलीस ठाण्यासमोर स्वत:ला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला अवैध वाळू उत्खननाप्रकरणी सुरू असलेल्या वादातून घडला प्रकार संबंधित आमदाराने जप्त करण्यात आलेले ट्रॅक्टर सोडवून घेण्यासाठी पोलीस सब इन्स्पेक्टरवर दबाव आणल्याचा पोलिसांचा आरोप