Usha Thakur : "पैसे, दारुच्या बदल्यात मतदान करणारे पुढच्या जन्मात उंट, मेंढ्या, कुत्रे, मांजर बनतील; जे लोकशाही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 11:02 IST2025-04-18T11:02:25+5:302025-04-18T11:02:42+5:30
Usha Thakur : भाजपा आमदार आणि माजी मंत्री उषा ठाकूर यांनी पैसे, दारू आणि गिफ्ट्सच्या बदल्यात मतदान करणाऱ्यांना फटकारलं आहे.

Usha Thakur : "पैसे, दारुच्या बदल्यात मतदान करणारे पुढच्या जन्मात उंट, मेंढ्या, कुत्रे, मांजर बनतील; जे लोकशाही...
मध्य प्रदेशातीलभाजपा आमदार आणि माजी मंत्री उषा ठाकूर यांनी पैसे, दारू आणि गिफ्ट्सच्या बदल्यात मतदान करणाऱ्यांना फटकारलं आहे. लोकशाही विकणारे लोक उंट, मेंढी, बकरी, कुत्रा आणि मांजर म्हणून पुनर्जन्म घेतील असं म्हटलं आहे. इंदूरच्या महू विधानसभा मतदारसंघातील हसलपूर गावात झालेल्या सभेत महिला आमदाराच्या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला.
लोकशाहीचं रक्षण करण्याचं आवाहन करताना भाजपाच्या आमदार म्हणाल्या की, "लाडली बहना योजना आणि किसान सन्मान निधीसारख्या भाजपा सरकारच्या विविध योजनांमधून प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यात हजारो रुपये येतात. यानंतरही जर मतं १,०००-५०० रुपयांना विकली गेली तर ती माणसांसाठी एक लाजिरवाणी बाब आहे."
"माझा देवाशी थेट संवाद"
"देव पाहत आहे, मतदान करताना तुमचा प्रामाणिकपणा गमावू नका. पैसे, साडी, ग्लास आणि दारू घेऊन तटस्थ झालेल्यांनी त्यांच्या डायरीत लिहावं की, ते पुढच्या आयुष्यात नक्कीच उंट, मेंढी, बकरी, कुत्रा आणि मांजर बनतील. जे लोकशाही विकतील ते हेच होतील. हे लिहून ठेवा. माझा देवाशी थेट संवाद आहे, माझ्यावर विश्वास ठेवा."
"मत विकलं तर तो अक्षम्य गुन्हा"
"राष्ट्र, धर्म आणि संस्कृतीची सेवा करणाऱ्या भाजपालाच मतदान करावं. लोकशाही हे आपलं जीवन आहे. संविधानातील तरतुदींनुसार सरकार लोकांचं जीवन सुधारण्यासाठी अनेक योजना राबवतं. ते वर्षाचे १२ महिने जनतेची सेवा करतात. अशा परिस्थितीत, निवडणुकीदरम्यान कोणत्याही परिस्थितीत जर एखाद्या व्यक्तीने पैसे, दारू किंवा इतर साहित्यासाठी आपलं मत विकलं तर तो अक्षम्य गुन्हा आहे. आपल्या कर्माच्या आधारे आपल्याला पुढचा जन्म मिळतो. जर आपलं कर्म वाईट असेल तर आपण माणूस म्हणून पुनर्जन्म घेणार नाही" असंही उषा ठाकूर यांनी म्हटलं आहे.