भोपाळ : मध्य प्रदेशच्या मैहरचे भाजपा आमदार नारायण त्रिपाठी यांनी नागरिकता सुधारणा कायदा (सीएए) ला विरोध केला आहे. या ऐवजी देशातील बेरोजगारीवर चर्चा होण्याची आवश्यकता आहे. सीएएमुळे देशातील वातावरण खराब होत आहे असल्याचे ते म्हणाले. एकीकडे भाजपाचे नेते देशभरात सीसीएच्या समर्थनार्थ प्रचार करत असताना भाजपाचाच आमदार विरोधात बोलल्याने अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
मी माझ्या अंतकरणापासून सीएएला विरोध करत आहे. यामुळे बंधुभाव संपत चालला आहे. लोक एकमेकांना संशयाने पाहत आहेत. मी पक्षाकडे माझे म्हणणे मांडणार आहे. हे माझे वैयक्तिक मत आहे. सीएए मतांच्या राजकारणासाठी ठीक आहे पण देशासाठी नाही, असे परखड मत त्रिपाठी यांनी मांडले आहे.
त्रिपाठी यांनी सांगितले की, देशात सध्या बेरोजगारीवर विचार करायची गरज आहे, ना ही धर्माच्या आधारावर नागरिकतेचा. धर्माच्या नावावर देशाचे विभाजन होता नये. एकतर तुम्ही संविधानासोबत आहात किंवा विरोधात आहात. जर संविधानाने चालायचे नसेल तर ते फाडून फेकून द्यावे. मी गावातून येतो. आजही गावात आधारकार्ड बनलेले नाहीत मग उरलेले कागदपत्रे कुठून येणार. जर देशाला पुढे न्यायचे असेल तर हा कायदा लागू करू नये, असे मत त्रिपाठी यांनी मांडले.
पक्षाच्या भुमिकेविरोधात जाण्याची त्रिपाठी यांची ही काही पहिलीच वेळ नाही. जुलै 2019 मध्ये विधानसभेमध्ये एका आमदारासाठी मतदान झाले होते. तेव्हा त्यांनी विरोधात मतदान केले होते. त्यांनी सांगितले की, कमलनाथ यांच्या विचाराने प्रभावित झालो आहे. मात्र, नंतर ते पुन्हा पक्षात आले होते. आता त्यांनी बदललेले सूर पुन्हा भाजपाला अडचणीत टाकू शकतात.