दंतेवाडा : छत्तीसगडच्या दंतेवाडामधील जंगलातून मंगळवारी भाजप आमदार भीमा मांडवी यांच्या वाहनांचा ताफा जात असताना नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणताच, त्यात आमदार मांडवी व चार पोलीस ठार झाले. स्फोटानंतर नक्षलवाद्यांनी त्या वाहनांवर गोळीबारही केला.
आ. मांडवी व भाजपचे स्थानिक नेते प्रचारासाठी जात असताना नक्षल्यांनी वाहनांपाशी स्फोट घडवून आणला. दंतेवाडा हा भाग बस्तर मतदारसंघात येतो. तिथे पहिल्या टप्प्यात ११ एप्रिल रोजी मतदान होणार असून, त्यात बदल करण्यात आलेला नाही.
बस्तर हा भाग नक्षलग्रस्त असल्याने तिथे सीआरपीएफचे ८0 हजार जवान तैनात करण्यात आले असून, ड्रोनचीही मदत घेतली जात आहे. नक्षली हल्ल्याचे वृत्त येताच मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. त्यांनी आ. मांडवी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आ. मांडवी यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असेही म्हटले आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनीही या प्रकाराचा निषेध केला आहे. या आधी २५ मे, २0१३ रोजी सुकमा जिल्ह्यात नक्षलींनी काँग्रेस नेत्यांच्या वाहनांवर हल्ला केला होता. त्यात राज्याचे माजी मंत्री महेंद्र कर्मा, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नंदकुमार पटेल जागीच मरण पावले होते, तर बॉम्बस्फोटात जखमी झालेले मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री विद्याचरण शुक्ला यांचे नंतर रुग्णालयात निधन झाले होते. (वृत्तसंस्था)