बस्ती - उत्तर प्रदेशीतील भाजप आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात झाला असून एका जनावरांनी त्यांच्या गाडीला धडक दिली. देवरिया जिल्ह्यातील रुद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत. बस्ती जिल्ह्यातील छावनी क्षेत्रात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २८ वर ही दुर्घटना घडली. आमदार जय प्रकाश निषाद असे त्यांचे नाव असून त्यांची गाडी रस्त्यावरुन जात असलेल्या मोकाट बैलांच्या कळपाला धडकली होती. सुदैवाने या दुर्घटनेत ते थोडक्यात बचावले. त्यांना किरकोळ जखम झाली असून गाडीचा चेंदामेंदा झाला आहे.
गाडीचा अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी आमदार आणि त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात पोलीस कर्मचाऱ्यांना गाडीतून बाहेर काढले. त्यानंतर, आमदार महोदयांना एका खाटेवर बसवून आराम करायला लावला. काही वेळानंतर दुसऱ्या गाडीतून ते लखनौसाठी रवाना झाले. एनएच 28 महामार्गावर खतमसराय गावाजवळून आमदार जय प्रताप हे गोरखपुरहून लखनौसाठी जात होते. माजी मंत्री आणि देवरिया जनपद च्या रुद्रपुर मतदारसंघाचे आमदार जयप्रकाश निषाद यांच्या फॉर्च्युनर गाडीसमोर मोकाट जनावरांचा कळप आल्याने ही कार हायवेवरच पलटी झाली. पलटी होऊन ही गाडी दूरवर फेकली गेली. आमदार महोदयांच्या गाडीला झालेला अपघात पाहून मोठ्या प्रमाणात स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
या फॉर्च्यूनर कारमधून ७ जण प्रवास करत होते, स्थानिकांनी सर्वांनाच प्रयत्नांची पराकाष्टा करुन बाहेर काढले. या दुर्घटनेत जय प्रकाश निषाद जखमी झाले आहेत. तर, सुरक्षा रक्षक कॉन्स्टेहबल ओम नरेश सिंह आणि कॉन्स्टेबल चंदन निषाद हेही जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना दुसऱ्या कारमधून इच्छित स्थळी रवाना केले.