नवी दिल्ली: कथुआ आणि उन्नव बलात्कार प्रकरणांमुळे भाजपासमोरील अडचणी वाढल्या आहेत. या दोन्ही प्रकरणांचा संबंध भाजपच्या आमदारांशी असल्यानं पक्षावर चोहोबाजूंनी टीका होतेय. त्यातच आता महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये भाजपाचे खासदार आणि आमदार आघाडीवर असल्याची आकडेवारी समोर आलीय. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सनं (एडीआर) याबद्दलचा अहवाल तयार केलाय. देशातील 51 खासदार आणि आमदारांवर महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. यापैकी 14 लोकप्रतिनिधी भाजपाच्या तिकीटावर निवडून आलेत. भाजपाच्या खालोखाल त्यांचाच मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचा क्रमांक लागतो. शिवसेनेच्या सात, तर तृणमूल काँग्रेसच्या सहा नेत्यांविरोधात महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. उन्नव बलात्कार प्रकरणात भाजपाचा आमदार प्रमुख आरोपी असतानाच असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सचा अहवाल प्रसिद्ध झालाय. 'देशातील 51 खासदार, आमदारांवर महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. या आमदार, खासदारांनी त्यांच्या शपथपत्रांमध्ये याबद्दलची माहिती दिली आहे. महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये विनयभंग, अपहरण, बलात्कार, वेश्या व्यवसायासाठी महिलांची तस्करी अशा गुन्ह्यांचा समावेश आहे,' अशी माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सनं दिली आहे. संस्थेनं या संदर्भातील राज्यवार आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे. महाराष्ट्रातील एकूण 12 खासदार, आमदारांवर महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. यानंतर पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो. पश्चिम बंगालमधील 11 खासदार, आमदारांवर महिला महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत.
लज्जास्पद... महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये भाजपा खासदार, आमदारांची संख्या जास्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 3:14 PM