हरदोई : गेल्या वर्षी समाजवादी पार्टीतून भाजपामध्ये गेलेले नरेश अगरवाल यांच्या उपस्थितीत मंदिरात झालेल्या कार्यक्रमात लोकांना जेवणाच्या पाकिटामध्ये दारूची बाटली घालून देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्या मुलानेच हा कार्यक्रम आयोजित केला होता.
नरेश अगरवाल यांचे चिरंजीव नितीन अगरवाल हे भाजपाचेआमदार आहेत. त्यांनी पासी समाजाचा मेळावा श्रावण देवी मंदिरात घेतला होता. तिथे आलेल्या प्रत्येकाला जेवणाचे पाकीट देण्याची व्यवस्थाही त्यांनी केली होती; पण लोकांनी पाकीट उघडले, तेव्हा त्यात पुरी-भाजी आणि त्यासोबत दारूची एक बाटली असल्याचे आढळून आले. या मेळाव्याला अनेक लहान मुलेही आली होती. त्यांनाही दारूची बाटली असलेले जेवणाचे पाकीट देण्यात आले.
या मेळाव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यात आ. नितीन अगरवाल हे सर्व गावप्रमुखांना जेवणाची पाकिटे घ्या आणि प्रत्येकाला ती वाटा, असे सांगताना दिसत आहेत. ती पाकिटे गावप्रमुखांमार्फत तुम्हाला मिळतील, पाकिटांचे वाटप सुरू आहे, तिथे लोकांनी जावे, पाकीट घ्यावे, असेही ते सांगताना दिसत आहेत. (वृत्तसंस्था)भाजपामध्ये खळबळया प्रकारामुळे भाजपामध्ये मात्र खळबळ माजली असून, हरदोईचे भाजपा खासदार अंशुल वर्मा यांनी जेवणाच्या पाकिटात दारूच्या बाटल्या घालून दिल्याबद्दल नितीन अगरवाल यांच्यावर टीका केली आहे. या प्रकाराची आपण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या तक्रारीनंतर आ. अगरवाल यांच्यावर भाजपा काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नरेश अगरवाल व त्यांचे पुत्र आ. नितीन यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण संपर्क झाला नाही.