बंगळुरू - कर्नाटक विधानसभेतील राजकीय नाटक अद्याप सुरूच असून, आज बहुमत चाचणी वेळी घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर विधानसभेचे अध्यक्ष रमेश कुमार यांनी सभागृहाचे कामकाज स्थगित केले आहे. दरम्यान, बहुमत परीक्षण करण्याआधीच सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आल्याने भाजपा आमदारांनी विधानसभेच्या सभागृहातच धरणे देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यपालांनी पाठवलेल्या पत्राला विधानसभा अध्यक्षांनी उत्तर द्यावे आणि मतदान घ्यावे अशी मागणी भाजपा आमदारांनी केली आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी बहुमत चाचणीसाठी १८ जुलै या तारखेची घोषणा केली होती. दरम्यान, आज विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर भाजपा आणि काँग्रेसच्या आमदारांमध्ये गरमागरम चर्चा झाली. यादरम्यान, भाजपाच्या एका शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेत विधानसभा अध्यक्षांना विश्वास प्रस्तावावरील चर्चा सुरू ठेवण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती केली त्यानंतर राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून गुरुवारीच बहुमताची चाचणी घेण्यात यावी, असा सल्ला दिला. त्यावर रात्रीचे १२ वाजले तरी चालतील पण आजच बहुमत परीक्षण व्हावे, अशी मागणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बी.एस. येडियुरप्पा यांनी केली.मात्र असे असतानाही विधानसभाध्यक्ष रमेश कुमार यांनी बहुमत चाचणी न घेताच विधानसभेचे कामकाज शुक्रवारपर्यंत स्थगित करण्याची घोषणा केली. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपाच्या आमदारांनी विधानसभेतच ठिय्या देत रात्रभर आंदोलन करण्याची घोषणा केली.