हुगळी : देशात लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून जोरदार सुरुवात झाली आहे. यादरम्यान, पश्चिम बंगालमधील हुगळी येथील भाजपाच्या उमेदवार लॉकेट चॅटर्जी यांनी टीएमसी कार्यकर्त्यांर हल्ल्याचा आरोप केला आहे. टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी मला मारहाण केली आणि माझ्या गाडीवर हल्ला केला. गाडीत बसण्याचा प्रयत्न केला, असे लॉकेट चॅटर्जी यांनी म्हटले आहे.
या घटनेची माहिती पोलिसांना दिली. मात्र, पोलीस घटनास्थळी आले नाहीत. याठिकाणी उमेदवारांच्या सुरक्षेचा मोठा अभाव आहे. टीएमसी मतदारांना घाबरवत आहे, असे लॉकेट चॅटर्जी म्हणाल्या. तसेच, बंगालमध्ये टीएमसीच्या कार्यकर्त्यांचा उद्धटपणा सतत वाढत आहे. यामुळे हुगळीत तृणमूलच्या माफियांचे वर्चस्व असल्याचे समोर येते, असे लॉकेट चॅटर्जी यांनी सांगितले.
संपूर्ण घटनेची माहिती देताना लॉकेट चॅटर्जी यांनी सांगितले की, दररोजप्रमाणे शनिवारी रात्री साडेनऊ वाजता निवडणूक प्रचार संपवून मी आदिशक्ती गावमार्गे बांसुरियाकडे जात होते. तिथं कालीतला नावाच्या ठिकाणाहून मला निमंत्रण आले होते. लोकांना भेटून पूजा करून मी तिथून निघत असताना मला पाहून काही लोक काळे झेंडे घेऊन 'गो बॅक'च्या घोषणा देऊ लागले. हे पाहून सुरक्षारक्षकांनी त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला.
यादरम्यान, मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. यावेळी एका व्यक्तीने मला दोनदा धक्का दिला आणि गाडीच्या आत बसण्याचा प्रयत्न केला. माझ्या ड्रायव्हरने त्याला ढकलून दरवाजा बंद केला. यावेळी आम्ही पोलिसांना कळवले असता ना पोलीस घटनास्थळी पोहोचले ना स्थानिक लोकांना कळले, असे लॉकेट चॅटर्जी म्हणाल्या. दरम्यान, भाजपाच्या उमेदवाराने सांगितले की, या घटनेवेळी प्रभाग क्रमांक 22 चे नगरसेवक रणजित सरदार आणि इतरही तेथे उपस्थित होते.
लॉकेट चॅटर्जी या हुगळीच्या विद्यमान खासदार आहेत. भाजपाने त्यांना या मतदारसंघातून पुन्हा तिकीट दिले आहे. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी टीएमसीच्या डॉ. रत्ना डे यांचा पराभव केला होता.