बंगळुरू : महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यसाठी केलेली चळवळ हे निव्वळ नाटक होते, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे माजी केंद्रीय मंत्री व लोकसभा खासदार अनंतकुमार हेगडे यांनी केले. अशी नाटके करणाऱ्यांना महात्मा का म्हणायचे असा सवालही हेगडे यांनी केला आहे. या विधानामुळे देशभर संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर भाजपने त्यांना नोटीस पाठवून खुलासा करण्यास सांगितले आहे.
महात्मा गांधी यांच्याविषयी अनुदार उद्गार सहन केले जाणार नाही, असे भाजपच्या नेत्याने सांगितले. तो म्हणाला की, अनंतकुमार हेगडे याबद्दल स्वत:हून दिलगिरी व्यक्त करतील, अशी अपेक्षा आहे. मात्र भाजपने हेगडे यांच्या वक्तव्यावरजाहीर भूमिका मात्र घेतलेली नाही. कदाचित हेगडे यांनी माफी मागून प्रकरण मिटवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
एका जाहीर सभेत हेगडे म्हणाले की, स्वातंत्र्यची चळवळ ब्रिटिशांच्या पाठिंब्याने व संमतीने करण्यात आली होती. त्यावेळच्या कथित नेत्यांना ब्रिटिश पोलिसांच्या लाठीमाराचा प्रसाद मिळाल्याचे एकही उदाहरण नाही. या नेत्यांची चळवळ नाटकी होती. त्यांनी ब्रिटिशांशी खरा संघर्ष कधीच केला नाही. तडजोड करूनच चळवळ चालविली. महात्मा गांधी यांचे आमरण उपोषण व सत्याग्रह हेदेखील नाटकच होते.
जावडेकर म्हणाले, केजरीवाल हे अतिरेकी
अनंतकुमार हेगडे यांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला असतानाच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तुलना अतिरेक्यांशी केली. ते म्हणाले की, केजरीवाल अराजकवादी आहेत. अराजकवादी व अतिरेकी यांच्यात काहीच फरक नसतो.