नवी दिल्ली : हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. याबाबत भाजपचे माजी खासदार आणि डब्ल्यूएफआयचे माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांनी भाष्य केलं आहे. दोन वर्षांपूर्वी षडयंत्र रचल्याचा आरोप ब्रिजभूषण शरण सिंह यांनी केला आहे.
"जवळपास दोन वर्षांपूर्वी १८ जानेवारीला या खेळाडूंनी षडयंत्र रचले होते. ज्या दिवशी हे सर्व सुरू झाले, त्यादिवशी मी हे राजकीय षडयंत्र असल्याचे सांगितले होते. यामध्ये काँग्रेसचा सहभाग होता, दीपेंद्र हुड्डा आणि भूपिंदर हुड्डा यांचाही सहभाग होता. तसेच, त्यांनी ही संपूर्ण स्क्रिप्ट लिहिली होती, हे खेळाडूंचे आंदोलन नव्हते. आता जवळपास दोन वर्षांनंतर या नाट्यात काँग्रेसचा हात असल्याचे समोर आले आहे", असा आरोप ब्रिजभूषण शरण सिंह यांनी केला आहे.
ब्रिजभूषण शरण सिंह पुढे म्हणाले की, "ती (विनेश फोगट) खोटे बोलत आहे. ज्यावेळी ती आंदोलन करत होती, त्यावेळी देशाला वाटत होते की, यामध्ये काही तथ्य असू शकते. त्यामुळे देशातील अनेक लोक आणि विरोधी पक्ष त्यांच्यासोबत आले होते. भाजप त्यांच्या विरोधात नव्हता. मात्र, भाजप सत्याचा शोध घेत होता. जर भाजप त्यांच्याविरोधात असता तर माझ्यावर एफआयआर दाखल झाली नसती. जर एफआयआर दाखल झाली असती तरी आरोपपत्र दाखल झाले नसते. कारण, ती ज्या केसबद्दल आणि दिवसाबद्दल बोलत आहे, त्या दिवशी मी तिथे नव्हतो. तरीही माझ्यावर आरोपपत्र आहे", असे ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले.
ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोपदरम्यान, विनेश फोगट व्यतिरिक्त ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकसह इतर अनेक कुस्तीपटूंनी गेल्या वर्षी भारतीय कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. याबाबत जंतरमंतरवर अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू होते. अलीकडेच दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने ब्रिजभूषण यांच्यावर आरोप निश्चित केले आहेत. लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता, मात्र नंतर स्थानिक न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. या वादात भाजपने लोकसभा निवडणुकीत ब्रिजभूषण सिंह यांचे तिकीट रद्द करून त्यांचा मुलगा करण भूषण यांना कैसरगंजमधून उमेदवारी दिली होती.
जुलानामधून विनेश फोगटला उमेदवारीकुस्तीपटू विनेश फोगटने काँग्रेसचा हात धरत राजकारणात एन्ट्री केले आहे. आगामी हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जुलानामधून विनेश फोगटला उमेदवारी दिली आहे. विनेशला उमेदवारी जाहीर केल्याने या मतदारसंघातील लढत रंजक बनल्याचे सांगितले जात आहे. सन २०१९ मध्ये JJP नेते अमर जीत दांडा यांनी निवडणूक लढवली होती. अमर जीत दांडा यांना ६१ हजार ९४२ मते मिळाली होती. तर याच मतदारसंघात भाजपा उमेदवाराला ३७ हजार ७४९ मते मिळाली होती. जेजेपी उमेदवार अमर जीत दांडा विजयी झाले होते.