Brij Bhushan Sharan Singh: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या तयारीला आता वेग आला आहे. अनेकविध गोष्टींचा आढावा घेतला जात आहे. तिकिटवाटपाबाबत अद्याप हालचाली सुरू झाल्या नसल्या तरी यासंदर्भात काही कयास बांधले जात आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर देशातील नामांकित महिला पैलवानांनी लैगिंक छळाचा आरोप केला होता. हे प्रकरण चांगलेच तापले होते. अनेक दिवस हे आंदोलन चालले होते. यानंतर आता पुन्हा एकदा ब्रिजभूषण सिंह चर्चेत आले आहेत. मीडियाशी बोलताना ब्रिजभूषण सिंह यांना लोकसभा तिकिटाबाबत प्रश्न विचारण्यात आला.
उत्तर प्रदेशमधील बाराबंकी येथून ब्रिजभूषण सिंह भाजपच्या तिकिटावर खासदार आहेत. बाराबंकी येथे एका क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनासाठी ब्रिजभूषण सिंह आले होते. बाराबंकी येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ब्रिजभूषण सिंह यांनी मीडियाशी संवाद साधला. एका पत्रकाराने त्यांना विचारले की, तुमचे तिकीट कापले जात आहे का? सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा आहे. यावर ब्रिजभूषण सिंह संतापले आणि माझे तिकीट कोण कापणार? फक्त नाव सांगा, असा प्रतिप्रश्न केला.
माझे तिकीट कोण कापणार? फक्त नाव सांगा
पत्रकारांनी प्रश्न विचारताच, कोण माझे तिकीट कापणार? फक्त नाव सांगा आणि हिंमत असेल तर कापून दाखवा. तुम्ही माझे तिकीट कापणार का? असा उलट प्रश्न ब्रिजभूषण सिंह यांनी केला. तसेच सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येईल, असा विश्वास ब्रिजभूषण सिंह यांनी व्यक्त केला.
दरम्यान, ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर एका अल्पवयीन कुस्तीपटूने लैंगिक छळाचे आरोप केले होते. या प्रकरणावर बराच गदारोळ झाला. कुस्तीपटूंनी दिल्लीतील जंतरमंतरवर अनेक दिवस जोरदार आंदोलन केले. या आंदोलनात ऑलिम्पिक पदके जिंकणारे खेळाडूही सहभागी झाले होते.