नवी दिल्ली : मागील दोन महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत जळणाऱ्या मणिपूरमधील क्रूरतेने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. मणिपूरमध्ये पुन्हा एकदा देशाला लाजवेल अशी घटना घडली. दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही जण २ महिलांची नग्न अवस्थेत धिंड काढत असल्याचे दिसते. धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली. महिलांची नग्न धिंड काढणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. यावरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपाला लक्ष्य केले आहे. तर राजकारण न करण्याचे आवाहन सत्ताधारी करत आहेत.
विविध राजकीय पक्षांसह संघटनांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अशातच भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपा खासदार ब्रीजभूषण शरण सिंह यांनी देखील या घटनेवर भाष्य केले आहे. खरं तर गेल्या काही महिन्यांपासून महिला कुस्तीपटूंनी भाजपा खासदार ब्रीजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. यानंतर दिल्ली पोलिसांनी चौकशी सुरु केली होती. पण या प्रकरणात ब्रीजभूषण सिंह यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
मणिपूरमधील घटनेवर बोलताना सिंह यांनी पीटीआय या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हटले, "मणिपूरची घटना अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याची दखल घेतली आहे. पण, ही घटना घडली आहे आणि खूपच निंदनीय आहे."
ईशान्येकडील राज्य असलेल्या मणिपूरमधील परिस्थिती हाताबाहेर गेल्याने सरकारसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. यासंदर्भात गृहमंत्री, अमित शाह यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्यासोबत चर्चा केली आहे. तसेच, व्हिडीओ प्रकरणात आतापर्यंत काय-काय कारवाई करण्यात आली, अशी विचारणा मुख्यमंत्री बिरेन सिंह यांना केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांना कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे.