देशात काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. या आधीच हिसारचे भाजप खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपल्या राजीनाम्याची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून दिली. राजकीय कारणामुळे मी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे ब्रिजेंद्र सिंह यांनी सांगितले.
दादा-ताई एकाच मंचावर; सुप्रिया सुळेंची टीका अन् अजित पवारांचं प्रत्युत्तर, दोघांमध्ये वाक्-युद्ध!
मला हिसारचे खासदार म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी पक्षाचे तसेच पंतप्रधान मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि अमित शहा यांचे आभार मानू इच्छितो, असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
बृजेंद्र सिंह यांनी भाजपच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात अटकळांना सुरुवात झाली आहे. ब्रिजेंद्र सिंह आता काँग्रेसमध्ये प्रवेश करु शकतात, असे बोलले जात आहे. माजी केंद्रीय मंत्री बीरेंद्र सिंह आणि भाजपचे माजी खासदार ब्रिजेंद्र सिंह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेण्यासाठी दिल्लीत पोहोचले आहेत.
ब्रिजेंद्र सिंह हे आयएएस अधिकारी राहिले आहेत. त्यांचे वडील बिरेंद्र सिंह २०२२ पर्यंत राज्यसभा सदस्य होते. बीरेंद्र सिंह हे १९७७, १९८२, १९९४, १९९६ आणि २००५ मध्ये पाच वेळा उचाना येथून आमदार झाले असून तीन वेळा ते राज्य सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. १९८४ मध्ये ओमप्रकाश चौटाला यांचा पराभव करून ते हिसार लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले.