चंडीगड / नवी दिल्ली : हरयाणातील हिसारचे भाजप खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी पक्षाच्या तसेच लोकसभा सदस्यत्वाचा रविवारी राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काही अपरिहार्य राजकीय कारणांमुळे आपण हे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. ब्रिजेंद्र सिंह यांचे वडील व भाजप नेते बिरेंद्र सिंह हेदेखील येत्या काही दिवसांत काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असे काँग्रेसचे खजिनदार अजय माकन यांनी सांगितले.
‘काही राजकीय कारणांमुळे निर्माण झालेल्या अस्वस्थतेमुळे आपण राजीनामा दिला. अस्वस्थता प्रामुख्याने वैचारिक मुद्द्यांबाबत होती. शेतकऱ्यांचे प्रश्न, अग्निवीर मुद्दा आणि आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटूंना वागणूक यांसारख्या अनेक मुद्द्यांवर मी सहमत नव्हतो,’ असे ते म्हणाले.
संभावना सेठ यांचा ‘आप’ला रामराम
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते पक्षांतर करत आहेत. यात आम आदमी पार्टीच्या नेत्या, अभिनेत्री संभावना सेठ यांचेही नाव समाविष्ट झाले आहे. रविवारी सेठ यांनी पक्षाचा राजीनामा दिला. याबाबतची माहिती त्यांनी सोशल मीडियावर दिली.
तेलंगणात बीआरएस नेते भाजपममध्ये
हैदराबाद : तेलंगणातील भारत राष्ट्र समितीच्या दोन माजी खासदारांसह ४ नेते आणि कॉंग्रेसच्या एका नेत्याने रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यात बीआरएसचे माजी खासदार जी. नरेश, सीताराम माजी आमदार एस. रेड्डी, जलगाम वेंकट राव आणि कॉंग्रेस नेते श्रीनिवास गोमसे यांचा समावेश आहे.
राजस्थानातील काँग्रेसचे दोन माजी मंत्री भाजपमध्ये
जयपूर : लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी मंत्री राजेंद्र यादव आणि लालचंद कटारिया यांच्यासह राजस्थानमधील अनेक काँग्रेस नेत्यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे माजी आमदार रिचपाल मिर्धा, विजयपाल मिर्धा आणि खिलाडी बैरवा, माजी अपक्ष आमदार आलोक बेनिवाल, राज्य काँग्रेस सेवा दलाचे माजी प्रमुख सुरेश चौधरी, रामपाल शर्मा व रिजू झुनझुनवाला यांच्यासह अन्य नेत्यांनीही भाजपचे कमळ हाती घेतले.