उज्जैन - फटाक्यांची विक्री आणि फटाके फोडण्यासंबंधी सुप्रीम कोर्टानं मोठा निर्णय दिला आहे. मात्र मध्य प्रदेशचे भाजपा खासदार चिंतामणी मालवीय यांनी सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. 'हिंदू परंपरेत आम्ही कोणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही' असं एक ट्वीट मालवीय यांनी केलं आहे.
फटाके फोडण्यासाठी फक्त दोन तास; सुप्रीम कोर्टाने ठरवून दिली ही वेळ
दिवाळीदरम्यान फटाक्यांच्या धूर आणि आवाजामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास टाळण्यासाठी कमी प्रदूषण करणारे फटाके फोडण्याची परवानगी कोर्टाकडून देण्यात आली आहे. एवढंच नाही तर दिवाळीत फटाके फोडण्यासाठीची वेळदेखील ठरवून देण्यात आली आहे. संध्याकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत फटाके फोडता येणार आहेत. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर मालवीय यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली. 'मी दिवाळीचा सण परंपरेनुसारच साजरा करणार आणि लक्ष्मीपूजन केल्यानंतर रात्री 10 नंतर मी फटाके फोडणार', असे सांगत त्यांनी थेट सुप्रीम कोर्टालाच आव्हान दिले आहे.