ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - म्हैसूर येथील भाजपाचे खासदार प्रताप सिम्हा वादात सापडण्याची शक्यता आहे. दिल्ली युनिव्हर्सिटीच्या रामजस कॉलेजमध्ये झालेल्या हिंसेनंतर त्या घटनेबबात सोशल मिडीयावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामध्ये सिम्हा यांनी उडी घेतली आहे.
रामजस कॉलेजमध्ये झालेल्या हिंसेवर गुरमेहर कौर या विद्यार्थिनीने सोशल मीडियावर कॅंपेन सुरू केलं आहे. त्यावर सिम्हा यांनी गुरमेहरची तुलना कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमसोबत केली आहे. त्यांनी एका बाजुला गुरमेहर आणि दुस-या बाजुला दाऊद इब्राहिमचा एक फोटो ट्विट केला. त्यावर देशद्रोही भूमिका मांडायला दाऊदने किमान वडिलांच्या नावाचा तरी वापर नाही केला असं म्हटलं आहे. या फोटोमध्ये गुरमेहरच्या हातात असलेल्या एका पोस्टरवर माझ्या वडिलांना पाकिस्तानने नाही तर युद्धाने मारलं असं लिहीलं आहे. तर दाऊदच्या हातात असलेल्या पोस्टरवर 1993 च्या स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्यांना मी नाही मारलं तर बॉम्बमुळे ते मेले असं लिहीलं आहे.
pic.twitter.com/NaG4xVrT2B— Pratap Simha (@mepratap) February 26, 2017
गुरमेहर कौरचे वडिल पाकिस्तानसोबत झालेल्या कारगील युद्धत शहीद झाले होते. काही दिवसांपूर्वी दिल्ली युनिव्हर्सिटीच्या रामजस कॉलेजमध्ये AISA आणि ABVP या विद्यार्थी संघटनांमध्ये हिंसा झाली होती. हे भांडण पुण्यापर्यंत पोहोचलं होतं. गुरमेहर यामुळे दु:खी आहे. 22 फेब्रुवारीला तिने आपलं फेसबुक प्रोफाईल फोटो बदलला त्यावर #StudentsAgainstABVP हॅशटॅग वापरून मी दिल्ली युनिव्हर्सिटीत शिक्षण घेते आणि मी अभाविपला घाबरत नाही. मी एकटी नाही आहे, भारतातील प्रत्येक विद्यार्थी माझ्यासोबत आहे असं लिहिलं होतं. हा फोटो सोशल मिडीयावर लगेच व्हायरल झाला आणि अनेक युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी अशाच आशयाचा फोटो फेसबुकवर लावला.