नवी दिल्ली : भाजप खासदार सीपी जोशी यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून राहुल गांधी यांचा पासपोर्ट रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच, राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देण्याची मागणी केली आहे. काँग्रेस नेत्याची बिनबुडाची वक्तव्ये आणि देशाची प्रतिमा मलिन करणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेत येत नाही, असे भाजप खासदार सीपी जोशी यांनी म्हटले आहे.
लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात भाजप खासदार सीपी जोशी यांनी म्हटले आहे की, राहुल गांधींसारख्या व्यक्तीला विरोधी पक्षनेतेपदावर बसवणे देशाच्या सुरक्षेला धोका आहे आणि त्यांच्या कारवाया पाहता ते देशविरोधी शक्तींच्या हातात खेळत असल्याचे स्पष्ट होते. एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून त्यांनी परदेशी भूमीवर केलेले विधान कोणत्याही प्रकारे योग्य नाही.
राहुल गांधी यांची विधाने राजकीय नसून ते पूर्णपणे देशविरोधी कारवायांच्या कक्षेत येतात, ज्यामुळे त्यांचे वर्तन संशयास्पद होते. देशाच्या अंतर्गत स्थैर्य आणि सीमांच्या सुरक्षेसोबतच त्यांच्या वक्तव्याचा आंतरराष्ट्रीय संबंधांवरही परिणाम होऊ शकतो, कारण ते विरोधी पक्षाच्या पदाचा गैरवापर करत आहेत, असे भाजप खासदार सीपी जोशी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले की, विरोधी पक्षनेत्याने काही मूलभूत तथ्ये लक्षात ठेवणे अपेक्षित आहे, परंतु आपल्या स्वार्थापोटी राहुल गांधी यांनी परकीय शक्तींच्या प्रभावाखाली राष्ट्रहित बाजूला ठेवले. याची अनेक उदाहरणे त्यांच्या गेल्या अमेरिकन भेटीतही पाहायला मिळाली. यावरून देशातील स्थिरता आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा खराब करण्याचा राहुलचा हेतू असल्याचे सिद्ध होते.
याचबरोबर, सीपी जोशी यांनी पत्रात विरोधी पक्षनेत्यांच्या अनेक विधानांचाही हवाला दिला आहे. तसेच, ते म्हणाले की, राहुल आपल्या देशातील अनेक उद्योगपतींची नावे घेऊन त्यांच्याविरोधात मोहीम चालवत आहेत. जगात असे कुठेही दिसले आहे का? जेव्हा पक्षाचा किंवा विरोधी पक्षाचा नेता दुसऱ्या देशात जाऊन आपल्याच देशातील उद्योगपतींच्या विरोधात विधाने करताना दिसतो, अखेर राहुल गांधी यांच्या या विधानामागचा हेतू काय आहे? विरोधी पक्षनेते राहुल भारतीय समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचे विकृत चित्र मांडतात.