नवी दिल्ली- काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांना गोळी मारायला हवी, असं वादग्रस्त विधान भाजपाचे खासदार डी.पी वत्स यांनी केलं आहे. काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे परत घेण्यावरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केलं आहे. 'दगडफेक करणाऱ्यांवर दाखल असलेले गुन्हे परत घेण्यासंदर्भातील माहिती मी वाचली. पण मला असं वाटतं जी लोक दगडं फेकतात त्यांना गोळी मारायला हवी', असं डी.पी वत्स यांनी सांगितलं.
दगडफेक करणाऱ्या 10 हजार जणांवर दाखल असलेले गुन्हे मागे घेण्यासंदर्भातील विचारात जम्मू-काश्मीरमधील पीडीपी-भाजपा सरकार आहे. त्यावर वत्स यांनी वक्तव्य केलंय. डी.पी वत्स हरियाणा मतदार संघातून राज्यसभेचे खासदार आहेत.
'मुलांकडून चुका होतात. त्याचं भविष्य धोक्यात नको', असं जम्मू-काश्मीर दौऱ्यावर गेलेल्या गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं होतं. आम्ही पहिल्यांदाचा दगडफेकीत सहभागी असलेल्या 10 हजार तरूणांचं भविष्य लक्षात घेता त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, असंही ते म्हणाले.