मुंबई – माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार राजीव प्रताप रुडी पुन्हा एकदा वैमाज्ञिकाच्या भूमिकेत दिसून आले. सांगलीतील शिवसेनेचे नेते संदीप गिड्डे पुण्याहून दिल्लीसाठी विमान प्रवास करत असताना राजीव प्रताप रुडी यांच्यासोबत त्यांची भेट झाली. ही भेट फक्त दोन प्रवाशांमधली नव्हती तर खुद्द राजीव प्रताप रुडी पायलटच्या भूमिकेत विमान चालवत होते. त्यामुळे रुडी यांना या भूमिकेत पाहून मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला असं ते म्हणाले.
या प्रवासाबद्दल संदीप गिड्डे म्हणतात की, माझ्यासाठी हा ऐतिहासिक विमान प्रवास होता. देशातील एक माजी केंद्रीय मंत्री विमान चालवतो हे देशाच्या लोकशाहीसाठी पुरकच होते. प्रवास तर आपण नेहमीच करत असतो, मात्र एखादा प्रवास हा विशेष घडामोडींमुळे कायमस्वरूपी आठवणीत राहत असतो. दिल्लीला जातानाचा विमान प्रवास देखील माझ्यासाठी असाच ऐतिहासिक ठरला. कारण या विमानाचे कॅप्टन देशाचे माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार राजीव प्रताप रुडी (Rajiv Pratap Rudy) होते असं त्यांनी सांगितले.
नेहमीप्रमाणे विमानात प्रवेश घेतल्यानंतर बोर्डिंग सूचनांकडे विशेष काही लक्ष नव्हतं, मात्र विमानाच्या कॅप्टनने ज्या वेळेला बोलायला सुरुवात केली तेव्हा बोलण्याचा ढंग नेहमीपेक्षा वेगळा वाटला आणि मी राजीव प्रताप रुडी या विमानाचा कॅप्टन आपल्या सर्वांचे स्वागत करतो हे जेव्हा कानावर पडलं तेव्हा आश्चर्याचा सुखद धक्का बसला. गेल्या काही दिवसापूर्वी दयानिधी मारन यांनी राजीव प्रताप रूडी चालवत असलेल्या विमानातून प्रवास केल्याच्या संदर्भात ट्विट केलं होतं. मात्र एका माजी केंद्रीय मंत्र्यांनी हौसेपोटी एखादे वेळेस विमान चालवलं असेल असं वाटलं. आज मात्र प्रत्यक्षात ते चालवत असलेल्या विमानात बसण्याचा व प्रवास करण्याचा योग आला हा क्षण व हा प्रवास खरोखरच ऐतिहासिक ठरला असंही संदीप गिड्डे यांनी म्हटलं.
त्याचसोबत भारतातील प्रचलित राजकीय व्यवस्थेत एखादा व्यक्ती खासदार किंवा मंत्री झाला तर शक्यतो आपल्या प्रोफेशनपासून दूर जातो. सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता या गर्तेत अडकतो. निवृत्तीच्या आधी पोरांची फिल्डिंग लावत राहतो. अमेरिकेमध्ये बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष पदावरुन पायउतार झाल्यानंतर नोकरी करत आहे. या राजकीय नेत्याबद्दल अभिमान वाटायचा असेच उदाहरण राजीव प्रताप रुडी यांच्या माध्यमातून भारतात देखील बघायला मिळाले ही या लोकशाहीतील छोटासा घटक म्हणून माझ्यासाठी समाधानाची गोष्ट नक्कीच आहे अशा शब्दात संदीप गिड्डे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.