भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपा खासदार गौतम गंभीर याच्या वडिलांच्या गाडीची चोरी झाली आहे. गंभीरच्या दिल्लीतल्या राजेंद्र नगर येथील घराबाहेरूनच ही कार चोरीला गेली आहे. बुधवारी रात्री ही घटना घडली. माहितीनुसार टोयोटा फॉर्च्युनर ही गाडी घराबाहेरील पार्किंगमध्ये उभी होती आणि ती चोरीला गेली. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेजवरून चोरांचा शोध सुरू आहे.
कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी नवी दिल्ली सरकारच्या मदतीला सर्वात आधी गौतम गंभीर पुढे आला. त्यानं दिल्ली सरकारला एक कोटींचा निधी दिला. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनला प्रतिसाद देताना त्यानं दोन वर्षांचा पगारही सहाय्यता निधीत देणार असल्याचे जाहीर केले. खासदार फंडातूनच नव्हे तर गौतम गंभीर त्याच्या फाऊंडेशनच्या मदतीनंही समाजकार्य करत आहे. दिल्लीतील मजूरांना गौतम गंभीर फाऊंडेशनतर्फे जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात येत आहे. कोरोना व्हायरशसी मुकाबला करताना निधन झालेल्या दिल्ली पोलिसाच्या कुटुंबाची जबाबदारीही गौतम गंभीरनं उचलली आहे.
त्यानं आणखी एका कृतीतून माणुसकीचं दर्शन घडवलं. गौतम गंभीर फाऊंडेशनतर्फे तृतीयपंथीयांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं गेलं. गंभीरनं सोशल मीडियावरून ही माहिती दिली आणि त्यानं आपल्या टीमचं कौतुकही केलं. त्यानं लिहिलं की,'' जात, धर्म, लिंग सर्व गौण आहे. केवळ माणुसकी महत्त्वाची आहे. माझ्या टीमचं मी कौतुक करतो की त्यांनी ती जपली आणि तृतीयपंथीयांपर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहोचलव्या.''