पाटणा - लोकसभा निवडणुकीचे तिकीट नाकारण्यात आलेल्या नेतेमंडळींनी दुसऱ्या पक्षात प्रवेशाचा धडाका लावला आहे. याच मालिकेत बिहारमधील मुजफ्फरपूरचे खासदार अजय निषाद यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसचा हात हाती घेतला आहे. राजधानी दिल्लीत काँग्रेसचे नेते पवन खेडा यांनी बिहार काँग्रेसचे अध्यक्ष अखिलेश सिंह यांच्या उपस्थितीत त्यांना पक्षाचे सदस्यत्व दिले. पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास आपण पुन्हा जनतेसमोर जाण्यास इच्छुक असल्याचे निषाद यावेळी म्हणाले.
भाजपने निषाद यांना तिकीट नाकारून राजभूषण निषाद यांना, तर सासाराममधून छेदी पासवान यांच्या जागी शिवेश राम यांना संधी दिली. त्यामुळे हे दोन्ही नेते नाराज झाले आहेत. निषाद भाजपकडून सलग दोनवेळा मुजफ्फरपूरमधून निवडून आले आहेत. यावेळी तिकीट कापताच त्यांनी पक्ष बदलून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पासवान यांचाही पक्ष बदलण्याचा विचार आहे. लोजप-रामविलासचे माजी खासदार अरुण कुमार यांनीही पक्षाचा राजीनामा दिला असून, दुसऱ्या पक्षाचे तिकीट मिळते का, याची शक्यता ते चाचपडून पाहत आहेत.
मुजफ्फरपूरमधून अनेक इच्छुकबिहारमध्ये काँग्रेसच्या वाट्याला केवळ नऊ जागा आल्या आहेत. यात कटिहार, किशनगंज, भागलपूर, समस्तीपूर, सासाराम, पटना साहिब, पश्चिम चंपारण, मुजफ्फरपूर, महाराजगंज यांचा समावेश आहे.निषाद हे मुजफ्फरपूरमधून काँग्रेसचे उमेदवार असतील, अशी चर्चा आहे. मात्र, काँग्रेस पक्षात असे अनेक नेते आहेत ज्यांना मुजफ्फरपूरमधून निवडणूक लढवायची आहे.त्यापैकी आमदार बिजेंद्र चौधरी यांना प्रबळ दावेदार मानले जाते. याशिवाय प्रदेशाध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह यांचे पुत्र आकाश सिंह हेदेखील मुजफ्फरपूरमधून इच्छुक आहेत.