मध्य प्रदेशातील रीवा मतदारसंघाचे भाजपा खासदार जनार्दन मिश्रा (BJP Janardan Mishra) यांनी जल संवर्धनाच्या मुद्द्यावरुन एक अजब सल्ला दिला आहे. "प्रत्येक ठिकाणी नदी, नाले आणि तलाव यातील पाणी आटत चाललं आहे. त्यामुळे पाणी वाचवलं पाहिजे. गुटखा खा, दारू प्या, थीनरचा वास घ्या किंवा आयोडेक्स खा… पण पाण्याचे महत्त्व समजून घ्या, पाण्याची बचत करा”, असं विधान जनार्दन मिश्रा यांनी केलं आहे. मिश्रा यांच्या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
रीवामध्ये जल संवर्धनाशी संबंधित एका शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमातील जनार्दन मिश्रा यांच्या अजब विधानाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. पाणी वाचवण्याचे आवाहन त्यांनी आवाहन केले आहे. "एखाद्या सरकारने वॉटर टॅक्स माफ केल्याची घोषणा केल्यावर पाण्याव्यतिरिक्त कुठल्याही टॅक्सची माफी द्या. मात्र वॉटर टॅक्स आम्ही भरू असं सांगा" असंही मिश्रा यांनी म्हटलं आहे.
“नदी, नाले आणि तलाव आटत चालले आहेत. दरवर्षी पाण्याची पातळी घसरत चालली आहे. पाण्याचा वापर वाढत असताना हे होणारच आहे. आपल्याला पाणी वाचवायचं आहे. जेव्हा पैसा खर्च केला जाणार, तेव्हाच पाणी वाचवलं जाईल. तुम्हाला हवं ते करा पण पाण्याची बचत करा" असं देखील जनार्दन मिश्रा यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी मिश्रा यांनी हातांनी शौचालयाची साफसफाई करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर आता ते आपल्या अजब विधानामुळे चर्चेत आले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"