जयपूर : केंद्रीय कृषी कायदे आणि त्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरीआंदोलनावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्यांकडून वादग्रस्त विधाने करणे सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या अनेक नेत्यांनी आंदोलक शेतकऱ्यांविरोधात टीका केली असून, आता राजस्थानमधील खासदाराची त्यात भर पडली आहे.
राजस्थानमधील दौसा येथून भाजप खासदार असलेल्या जसकौर मीणा यांनी आंदोलक शेतकऱ्यांची तुलना खलिस्तान्यांशी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी युगपुरुष आहेत. त्यांना देशात बदल घडवायचा आहे. त्याचाच एक भाग म्हणून कृषी कायदे आणले आहेत. शेतकरीआंदोलनात दहशतवादी एके-४७ घेऊन फिरत आहेत. तेथे बसलेले खलिस्तानी आहेत, असा दावा मीणा यांनी केला.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या तीन सदस्यीय समितीची पहिली बैठक मंगळवारी पार पडली. न्यायालयाने गठीत केलेली समिती कृषी कायद्याबाबत शेतकरी, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची काय भूमिका आहे ती जाणून घेणार आहे. याबाबतचा अहवाल सर्वोच्च न्यायालयास देताना सदस्यांचे खासगी मतही मांडले जाईल. शेतकऱ्यांसोबत चर्चा करणे हे सगळ्यात मोठे आव्हान आहे; परंतु आम्ही प्रयत्नशील आहोत, असे समितीचे सदस्य अनिल घनवट यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता ५५ दिवस पूर्ण झाले आहेत. दिल्लीच्या सीमेवर दोन लाखांवर शेतकरी थंडीच्या कडाक्यात बसले आहेत. बुधवारी मंत्रीगट आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चेची दहावी फेरी होणार आहे. आतापर्यंत झालेल्या बैठकांमध्ये कोणताही तोडगा निघू शकला नाही. प्रत्येक बैठकीत मंत्री शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकूण घेत आहेत. परंतु त्यावर सरकारची भूमिका अद्याप स्पष्ट होऊ शकली नाही.