हिमाचल प्रदेशमध्ये आलेल्या पूर परिस्थितीची भाजप खासदार कंगना रणौतने (Kangana Ranaut) पाहणी केली. मंडीची खासदार कंगनाने हिमाचल प्रदेशमधीलपूरग्रस्त भागात जाऊन तेथील लोकांची विचारपूस केली. यावेळी सरकारी गाड्यांचा वापर न करता ती स्वत: चालत त्या त्या ठिकाणी पोहोचली. पूरामुळे लोकांचं झालेलं नुकसान पाहून ती भावूक झालेली दिसली.
सिमला जिल्ह्यातील रामपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून ढगफुटीमुळे तीव्र नुकसान झाले. खासदार कंगनाने टीमसोबत पूरग्रस्त भागाची पाहणी केली. ज्यांचं नुकसान झालं आहे अशा लोकांशी तिने संवाद साधला, त्यांना धीर दिला. ही परिस्थिती केंद्र सरकारपर्यंत पोहचवून तुम्हाला योग्य ती मदत मिळेल असं आश्वासन तिने दिलं. पूरग्रस्त भागात पोहोचण्यासाठी ती स्वत: डोंगराळ रस्ते चढली.
पूरामुळे लोकांचं झालेलं प्रचंड नुकसान पाहून ती भावूक झाली. कंगनाने X वर लिहिले, 'हिमाचल प्रदेशात आज पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहे. या विशाल ब्रह्मांडात आपण खूपच असुरक्षित आहोत. हे धरती, आमच्यावर दया कर.'
पाहणीनंतर कंगना माध्यमांशी संवाद साधताना म्हणाली, "राज्य सरकारची हालत तर सर्वांनाच माहित आहे. गेल्या वेळी विस्थापितांना केंद्राच्या निधीतून 7 लाख देण्यात येतील असं आश्वासन देण्यात आलं होतं. ते 7 लाख मिळाले का? गावातील लोक स्वत:च पूल बनवत आहेत. पंतप्रधान नक्की पॅकेज देतील. त्यांनी गेल्यावर्षीही 1800 कोटींचं पॅकेज दिलं होतं. आताही देतील आणि ते सुक्खूजींना मिळेल. मला वाटतं ते पैसे विस्थापितांना मिळतील की नाही याची चौकशी व्हायला हवी. इथे जो भ्रष्टाचार सुरु आहे त्यावर लगाम लावला पाहिजे."
हिमाचल प्रदेशातील तीन जिल्ह्यात ढगफुटीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली. यामध्ये 14 लोकांचा जीव गेला तर ४० जण बेपत्ता आहेत. ३१ जुलैच्या रात्री कुल्लूमधील निरमंड, सैंज आणि मलाना, मंडीमधीस पधर आणि सिमलामधील रामपूर येथे ढगफुटीनंतर ४० लोक बेपत्ता झाले आहेत. कुलू आणइ सिमला बॉर्डरवर असणाऱ्या समेज गावाचं सर्वात जास्त नुकसान झालं. येथील ३० हून अधिक लोक बेपत्ता आहेत.