मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढण्यात आल्याच्या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) खासदार लॉकेट चॅटर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीदरम्यान झालेल्या लैंगिक छळाच्या अशाच घटनांबद्दल भाष्य केले. यावेळी लॉकेट चॅटर्जींना अश्रू अनावर झाले आणि लोकांना बंगालच्या मुलींकडेही लक्ष देण्यास सांगितले.
लॉकेट चॅटर्जी शुक्रवारी पत्रकार परिषदेत पंचायत निवडणुकीदरम्यान घडलेला एक प्रसंग सांगताना भावूक झाल्या. बंगालच्या हावडा जिल्ह्यात ८ जुलै रोजी झालेल्या पंचायत निवडणुकीदरम्यान भाजप उमेदवारासोबत झालेल्या कथित लैंगिक छळाची आठवण करून लॉकेट चॅटर्जी अश्रू ढाळले. यावेळी, त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर आरोप केले.
लॉकेट चॅटर्जी म्हणाल्या, "बंगालमध्ये एकामागून एक घटना घडत आहेत. सांगा कुठे जायचे. आपणही देशाच्या मुली आहोत. मणिपूरची मुलगी सुद्धा देशाची मुलगी आहे. पश्चिम बंगालही देशात आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणतात की ही छोटीशी घटना आहे. मुर्शिदाबाद असो, दक्षिण २४ परगणा असो की कूचबिहार… सर्वत्र हेच घडत आहे. पंचायत निवडणुकीत लूट झाली, मतमोजणी झाली आणि ते जिंकले."
पत्रकार परिषदेला संबोधित करताना आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा दाखला देत लॉकेट चॅटर्जी म्हणाल्या, आम्हीही महिला आहोत. आम्हालाही आमच्या मुलींना वाचवायचे आहे. आपणही देशाच्या मुली आहोत. पश्चिम बंगाल हा देशाचा एक भाग आहे. कालच्या मणिपूर घटनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निषेध केला. प्रत्येक राज्यात महिलांच्या सुरक्षेसाठी कायदा आणि सुव्यवस्थेचे काम व्हायला हवे. तुम्ही आमच्या राज्यातील मुलींबद्दल बोलावे अशी आमची इच्छा आहे, असेही लॉकेट चॅटर्जी यांनी सांगितले.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील महिला उमेदवाराने तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर छेडछाड आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला आहे. ही घटना ८ जुलै रोजी घडल्याचं सांगण्यात येत आहे. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला विवस्त्र करून गावभर फिरवल्याचा आरोप पीडितेने केला आहे. दरम्यान, या प्रकरणी पांचला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.