"हिंदुत्वावर व्हिडीओ बनवल्यास...", भाजप खासदाराला फोनवरून जीवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 12:03 AM2024-07-20T00:03:34+5:302024-07-20T00:04:15+5:30

Mahendra Singh Solanki: देश आणि हिंदुत्वासाठी काम करणारा कोणालाच घाबरत नाही, असे खासदार महेंद्रसिंह सोलंकी  म्हणाले.

BJP MP Mahendra Singh Solanki claims he got death threat call 'for making videos on Hindutva' cops begin probe | "हिंदुत्वावर व्हिडीओ बनवल्यास...", भाजप खासदाराला फोनवरून जीवे मारण्याची धमकी

"हिंदुत्वावर व्हिडीओ बनवल्यास...", भाजप खासदाराला फोनवरून जीवे मारण्याची धमकी

मध्य प्रदेशातील देवासमध्ये एका भाजप खासदाराला व्यक्तीने फोनद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी भाजप खासदाराने पोलिसांकडे तक्रार केली आहे. हिंदूत्ववादी व्हिडिओ बनवल्याबद्दल संबंधीत व्यक्तीकडून आपल्याला जीवे मारण्याची धमकी आल्याचे भाजप खासदाराने आपल्या तक्रारीत पोलिसांना सांगितले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा देवास एसपींनी तपास सुरू केला आहे. 

प्राथमिक माहितीनुसार, ज्या व्यक्तीने खासदाराला फोन केला, तो उत्तर प्रदेशातील कानपूरमधील रहिवासी असल्याचे समजते. पोलिसांनी सांगितले की, देवास शाजापूरचे खासदार महेंद्रसिंह सोलंकी यांना शुक्रवारी एका अज्ञात व्यक्तीकडून फोनवर जीवे मारण्याची धमकी आली. महेंद्रसिंह सोलंकी हे राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी व्हिडिओ बनवतात, त्यामुळे त्यांना जीवे मारण्याची धमकी त्या व्यक्तीने दिली. महेंद्रसिंग सोलंकी आलेला फोन हा उत्तर प्रदेशातील कानपूरमधून आल्याचे समोर आले आहे.

महेंद्रसिंह सोलंकी यांनी पोलिसांना सांगितले की, सकाळी ११.४० च्या सुमारास ते त्यांच्या टिळक नगर येथील निवासस्थानी होते. दरम्यान त्यांच्या नंबरवर फोन आला. फोन करणाऱ्याने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. धमकी दिल्यानंतर त्या व्यक्तीने फोनवर शिवीगाळ सुरू केली, त्यानंतर खासदार महेंद्रसिंह सोलंकी यांनी फोन कट केला. ज्या नंबरवरून कॉल आला होता, तो आता बंद करण्यात येत असल्याचे महेंद्रसिंह सोलंकी  यांनी सांगितले. याप्रकरणी महेंद्रसिंह सोलंकी यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार दिली आहे. 

दरम्यान, देश आणि हिंदुत्वासाठी काम करणारा कोणालाच घाबरत नाही, असे खासदार महेंद्रसिंह सोलंकी  म्हणाले. तसेच, "मी कोणालाही घाबरत नाही. जर कोणी देशासाठी काम करत असेल तर त्याला सतत धमक्या येत असतात, अशा धमक्यांची मी अजिबात पर्वा करत नाही. माझे काम आजवर जसे आहे, तसे सुरू राहणार आहे", महेंद्रसिंह सोलंकी यांनी सांगितले.

न्यायाधीश बनले खासदार! 
देवास शाजापूरचे खासदार महेंद्रसिंह सोलंकी यांनी २०१९ मध्ये पहिल्यांदाच भाजपच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली होती आणि जिंकली होती. यापूर्वी महेंद्रसिंह सोलंकी हे न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. २०१९ मध्येच त्यांनी न्यायाधीशांची खुर्ची सोडली आणि लोकसभा निवडणूक लढवली. यानंतर पक्षाने त्यांना २०२४ मध्ये पुन्हा संधी दिली आणि ते पुन्हा विजयी झाले. २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रल्हाद टिपणया यांचा पराभव केला आणि २०२४ मध्ये त्यांनी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र मालवीय यांचा पराभव केला.

Web Title: BJP MP Mahendra Singh Solanki claims he got death threat call 'for making videos on Hindutva' cops begin probe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.