दिल्ली सरकारने सार्वजनिक ठिकाणी छट पूजेच्या कार्याक्रमांना बंदी ( Chhath puja ban) आणली आहे. कोरोनामुळे गर्दी जमेल आणि रुग्ण वाढतील म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. याविरोधात भारतीय जनता पार्टीने आंदोलन सुरु केले असून मंगळवारी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. यावेळी भाजपा खासदार मनोज तिवारी (Manoj Tiwari) जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.
भाजपा खासदार मनोज तिवारी आणि शेकडो कार्यकर्ते मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाकडे जाऊ लागले. दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी बॅरिकेड्स लावले होते. आंदोलकांनी हे बॅरिकेड्स तोडले आणि पुढे जाऊ लागले. यामुळे पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी पाण्याचा मारा केला. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत मनोज तिवारी जखमी झाले.
मनोज तिवारींना तातडीने सफदर जंग हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. अद्याप डॉक्टरांनी त्यांच्या तब्येतीबाबत काहीही माहिती दिलेली नसून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.