नवी दिल्ली - लोकप्रिय भोजपुरी अभिनेते आणि भाजपा खासदार मनोज तिवारी एका अपघातातून थोडक्यात बचावल्याची घटना समोर आली आहे. बिहार निवडणुकीसाठी भाजपाच्या प्रचारात सध्या मनोज तिवारी व्यस्त आहेत. याचदरम्यान निवडणुकीच्या प्रचारासाठी निघालेले असताना त्याचं हेलिकॉप्टर तब्बल 40 मिनिटं गायब झालं होतं. काही तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टरशी असलेला संपर्क तुटला होता. मात्र त्यानंतर पाटणा येथे हेलिकॉप्टरचं यशस्वीरित्या 'इमर्जन्सी लँडींग' करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज तिवारी पाटणा येथून मोतिहारी येथे निवडणूक प्रचारासाठी जात होते. यासाठी पाटणाच्या बेहटिया विमानतळावरून त्यांच्या हेलिकॉप्टरने उड्डाण केले. मात्र उड्डाणानंतर हेलिकॉप्टरशी असलेला संपर्क तुटला आणि 40 मिनिटं ते गायब होतं. कोणतीही माहिती मिळत नव्हती. काही तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टरला इमर्जन्सी लँडींग करावं लागलं. पाटणा येथे लँडींग केल्यानंतर धोका टळला आहे.
मनोज तिवारी यांच्यासह हेलिकॉप्टरमध्ये असलेले सर्वच जण सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे. इमर्जन्सी लँडींगमुळे सर्व जण थोडक्यात बचावले आहेत. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. मनोज तिवारी हे भाजपाच्या स्टार प्रचारकांपैकी एक आहेत. काही दिवसांपूर्वी तिवारी यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती. सभांमध्ये वाढणारी गर्दी लक्षात घेऊन या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
"राम मंदिराची तारीख विचारणारे आता नाईलाजाने टाळ्या वाजवताहेत", मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
बिहारमध्ये जोरदार प्रचार सुरू आहे. दरभंगा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची रॅली पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राम मंदिराच्या उभारणीवरून त्यांनी विरोधकांना सणसणीत टोला लगावला आहे. "राम मंदिराची तारीख विचारणारे आता नाईलाजाने टाळ्या वाजवताहेत" असं म्हणत पंतप्रधान मोदींनी निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी यांनी "गेल्या अनेक वर्षांच्या तपस्येनंतर आता राम मंदिराच्या उभारणीचं काम सुरू झालं आहे. राम मंदिराची तारीख विचारणारे आता नाईलाजाने टाळ्या वाजवत आहेत. प्रत्येक शेतकऱ्याच्या थेट बँक खात्यात आम्ही मदत पोहोचवणार असल्याचं सांगितलं होतं. आतापर्यंत जवळपास एक लाख कोटी रूपयांपेक्षा अधिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे" असं म्हटलं आहे.