संत कबीरनगर - सपा आणि बसपामध्ये झालेल्या आघाडीने उत्तर प्रदेशातभाजपाच्या अडचणी वाढवल्या आहेत. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपातील अंतर्गत वादही चव्हाट्यावर येत आहे. संत कबीरनगर मतदारसंघामध्ये आज एका कार्यक्रमादरम्यान भाजपा खासदार शरद त्रिपाठी आणि आमदार राकेश सिंह यांच्यात जोरदार हाणामारी झाली. या प्रकाराच्या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम काही दिवसांतच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या उत्तर प्रदेशमध्ये सत्ताधारी असलेल्या भाजपाकडून विविध ठिकाणी उदघाटन आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. असाच कार्यक्रम संत कबीरनगर येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला खासदार शरद त्रिपाठी आणि मेहदावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार राकेश सिंह यांच्यासह भाजपाचे इतर नेते उपस्थित होते.
यावेळी भूमिपूजनाच्या शिलालेखावर आपले नाव नसल्याने खासदार शरद त्रिपाठी संतप्त झाले. त्यावरून त्यांची राकेश सिंह यांच्याशी बाचाबाची झाली. त्यावेळी शरद त्रिपाठी यांनी चप्पल काढून राकेश सिंह यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आमदार राकेश सिंह यांनीही त्रिपाठी यांना प्रत्युत्तर देत मारहाण केली. अखेर तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी मध्यस्थी करत हे भांडण सोडवले व दोन्ही नेत्यांना एकमेकांपासून दूर नेले.
दरम्यान, या प्रकाराची गंभीर दखल भाजपाच्या नेतृत्वाने घेतली आहे. तसेच संबंधित खासदार आणि आमदारांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती उत्तर प्रदेश भाजपाध्यक्ष महेंद्रनाथ पांडे यांनी दिली आहे.