रांची: 'ईडी'च्या तपासाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतून अचानक गायब झालेले झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन अखेर तब्बल ४० तासांनी रांचीत पोहोचले. यानंतर आता हेमंत सोरेन ईडीसमोर चौकशीसाठी उपस्थित होणार असल्याचे सांगितले जात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हेमंत सोरेन यांना दिल्लीतून पळून जाण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मदत केली असा दावा भाजप नेत्याने केला आहे.
ईडीने अनेकदा नोटीस पाठवूनही मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी त्यावर काहीच कार्यवाही केली नसल्याने अखेर ईडी हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचली. ईडीने सोरेन यांच्या दिल्लीतील निवासस्थानातून ३६ लाखांची रोकड, दोन कार आणि काही कागदपत्रे जप्त केली. हेमंत सोरेन यांना अटक होण्याची भीती असल्याने ते तुरुंगात जाण्यापूर्वी पत्नी कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री बनवू शकतात, असे मानले जात आहे, तर राष्ट्रपती राजवटीची शक्यता बळावली आहे.
हेमंत सोरेन यांना दिल्लीतून पळून जायला केजरीवाल यांनी मदत केली
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी मोठा दावा केला आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना रस्ते मार्गाने दिल्लीतून पळून जाण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मदत केली. केजरीवाल यांनी वाराणसीपर्यंत जायला हेमंत सोरेन यांची मदत केली. त्यानंतर मिथिलेश कुमार यांनी सोरेन यांना रांचीपर्यंत सहीसलामत पोहोचवले, असा दावा निशिकांत दुबे यांनी केला आहे. निशिकांत दुबे यांच्या विधानावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
दरम्यान, जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने आतापर्यंत १४ जणांना अटक केली आहे. ज्यामध्ये २०११ च्या बॅचचे IAS अधिकारी छवी रंजन यांचाही समावेश आहे. ईडीच्या तपासामुळे झारखंडमध्ये राजकीय पेच निर्माण झाला आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे (झामुमो) काही आमदार रांचीच्या सर्किट हाऊसमध्ये थांबले आहेत.