"भारताचे तुकडे करण्यासाठी USAID ने खर्च केले ५ हजार कोटी?’’ भाजपा खासदाराचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 15:12 IST2025-02-10T15:12:13+5:302025-02-10T15:12:53+5:30
BJP MP Nishikant Dubey raised USAID Funding issue in Lok sabha: भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी अमेरिकन संस्था यूएसएआयडी कडून भारताचे तुकडे करण्यासाठी विविध संस्थाना निधी दिला गेल्याचा दावा केला. तसेच या प्रकरणी चौकशी करून दोषी आढळणाऱ्या लोकांना तुरुंगात टाकावे, अशी मागणी दुबे यांनी सरकारकडे केली.

"भारताचे तुकडे करण्यासाठी USAID ने खर्च केले ५ हजार कोटी?’’ भाजपा खासदाराचा गंभीर आरोप
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून अमेरिकेत अनेक क्षेत्रात उलथापालथ होत आहेत. अध्यक्षपदी येताच ट्रम्प यांनी अमेरिकन एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटला (USAID) वेसण घातली आहे. यूएसएआयडीकडून उद्योगपती जॉर्ज सोरोसच्या संघटनांना २६ कोटी डॉलर मिळाल्याचा आरोप ट्रम्प यांनी आधी केला होता. सोरोसने या पैशांचा वापर भारत आणि बांगलादेशसह अनेक देशांत अस्थिरता निर्माण करण्यासाठी आणि राजकीय क्षेत्रात ढवळाढवळ करण्यासाठी केला, असा दावाही ट्रम्प यांनी केला होता. आता संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनामध्ये भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी हा मुद्दा उपस्थित केला.
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी अमेरिकन संस्था यूएसएआयडी कडून भारताचे तुकडे करण्यासाठी विविध संस्थाना निधी दिला गेल्याचा दावा केला. तसेच या प्रकरणी चौकशी करून दोषी आढळणाऱ्या लोकांना तुरुंगात टाकावे, अशी मागणी दुबे यांनी सरकारकडे केली. यावेळी काँग्रेसचे अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोसोर याच्याशी संबंध असल्याच्या आरोपांचा निशिकांत दुबे यांनी पुनरुच्चार केला.
शून्य प्रहरामध्ये हा मुद्दा उपस्थित करताना भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी सांगितले की, अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यूएसएआयडी संस्थेला पूर्णपणे बंद केलं आहे. ही संस्था अनेक वर्षांपासून विविध सरकारं पाडण्यासाठी आर्थिक ताकद लावत होती. निशिकांत दुबे पुढे म्हणाले की, यूएसएआयडीने जॉर्ज सोरोसच्या ओपन सोसायटी फाऊंडेशनला भारताचे तुकडे पाडण्यासाठी पाच हजार कोटी रुपये दिले होते की नाही. त्याने राजीव गांधी फाऊंडेशनला पैसे दिले होते की नाही, हे आता विरोधी पक्षांनी सांगावं.
विविध संस्थांना यूएसएआयडीकडून पैसे दिले गेल्याचा आरोप करताना निशिकांत दुबे यांनी या सर्वाची चौकशी करण्याची तसेच ज्यांनी देशाचं नुकसान करण्यासाठी पैसे घेतले आहेत, त्यांना तुरुंगात टाकण्याची मागणी केली. दरम्यान, निशिकांत दुबे यांनी आरोप केल्यानंतर काँग्रेसचे सदस्यही आक्रमक झाले तसेच त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.