नवी दिल्लीः महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेला देशभक्त म्हटल्यानं प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर चहूबाजूंनी टीका करण्यात आली. त्यानंतर भाजपानंही संरक्षणविषयक संसदीय सल्लागार समितीवरून त्यांना हटवलं. आजही संसदेत गदारोळ झाला असता, प्रज्ञासिंह ठाकूरांनी माफी मागितली. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, माझ्या विधानानं जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास मी माफी मागते, असंही त्या म्हणाल्या आहे. संसदेतील एका सदस्यानं मला दहशतवादी म्हटलं आहे. हा माझ्या प्रतिष्ठेवर हल्ला आहे. न्यायालयात माझ्याविरोधात अजूनही आरोप सिद्ध झालेले नाहीत.माझा कोणताही दोष नसताना मला दहशतवादी ठरवणं कायद्याच्या विरोधात आहे. तरीही मी कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास माफी मागते. संसदेत प्रज्ञा सिंह ठाकूरांच्या विधानानं काँग्रेसनं मोठा गोंधळ घातला आहे. महात्मा गांधींची जय अशा घोषणाही विरोधकांनी दिल्या आहेत. तर भाजपाच्या खासदारांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी प्रज्ञासिंह ठाकूरांना ट्विटरवरून दहशतवादी म्हटल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला; गोडसेच्या विधानावर प्रज्ञासिंह ठाकूरांचा माफीनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 13:21 IST