“आता शौचालयात दारुची दुकाने उघडा”; साध्वी प्रज्ञा सिंह अधिकाऱ्यांवर संतापल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 04:04 PM2022-04-29T16:04:35+5:302022-04-29T16:05:36+5:30
मद्य धोरणावरून शिवराज सिंह चौहान सरकारवर विरोधक टीका करत असतानाच भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनीही यावरून नाराजी व्यक्त केली आहे.
भोपाळ: मध्य प्रदेशातीलशिवराज सिंह चौहान सरकारच्या मद्य धोरणांवरून विरोधक सातत्याने टीका करताना पाहायला मिळत आहेत. यातच आता भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर (Sadhvi Pragya Singh Thakur) यांनी शिवराज सिंह चौहान सरकारला घरचा आहेर दिला आहे. दारुच्या दुकानांना दिलेल्या परवान्यांवरून साध्वी प्रज्ञा सिंह यांनी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला. याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे सांगितले जात आहे. दारुची दुकाने खुली करण्यासाठी बाहेर कुठे जागा शिल्लक राहिली नसल्यास आता थेट शौचालयात ती सुरू करा, या शब्दांत साध्वी प्रज्ञा सिंग यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांवर संतप्त झालेल्या दिसत आहेत. तसेच मद्य धोरणावरून नाराजी व्यक्त करत आता शौचालयात दारुची दुकाने उघडा, असा सल्ला देताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याकडे एका सोसायटीमधील रहिवाश्यांनी तक्रार केली होती. त्यांच्या सोसायटीच्या शेजारी असलेल्या दारुच्या दुकानामुळे त्रास होत असल्याचे गाऱ्हाणे मांडत तेथून दुकान तातडीने हटवण्याची मागणी स्थानिकांनी केली होती. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी प्रज्ञा सिंह यांनी संबंधित कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता.
दारुच्या दुकानांसाठी दुसरी जागा राहिली नाही का?
दारुची दुकाने सुरू करण्यासाठी दुसरी कुठली जागा शिल्लक राहिली नसेल, तर शौचालयात ती सुरू करा. कदाचित तिथेही ती चालतील. दारुची दुकाने कोणत्याही रहिवासी भागाजवळ असता कामा नये. सार्वजनिक ठिकाणी असू नये. दारुच्या दुकानांमुळे कोणलाही त्याचा त्रास होत कामा नये. समाजकंटक व्यक्तीच दारु पितात. त्यांची खात्री कोणालाही देता येत नाही. सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. सरकारच्या या धोरणाला माझा विरोध आहे. आताच्या घडीला दारुचे दुकान ५०० मीटर दूर करावे, असे निर्देश प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी दिल्याचे दिसत आहे.