भोपाळ: भारतीय जनता पक्षाच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांची प्रकृती बिघडली आहे. भोपाळमधील भाजपा कार्यालयात डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला ठाकूर उपस्थित होत्या. त्यावेळी अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना घरी नेण्यात आलं. लॉकडाऊन सुरू होण्याआधीपासून भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. अनलॉक सुरू होताच ठाकूर भोपाळमध्ये परतल्या. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्या भोपाळमधल्या पक्ष कार्यालयात आल्या होत्या. त्यावेळी त्यांची प्रकृती बिघडली.पक्ष कार्यालायत पोहोचल्यानंतर थोड्याच वेळात प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी अस्वस्थ वाटू लागलं. त्यांना भोवळ येऊ लागली. जवळच उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्यांनी होत असलेल्या त्रासाची माहिती दिली. त्यानंतर लगेचच त्यांना खुर्चीत बसवण्यात आलं. थोड्या वेळानं त्यांना घरी नेण्यात आलं. सध्या प्रज्ञा सिंह ठाकूर त्यांच्या घरी आहेत. एक वैद्यकीय पथक त्यांच्या तपासणीसाठी पोहोचलं आहे. साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या डोळ्यांवर उपचार सुरू आहेत. या उपचारांचा भाग म्हणून घेत असलेल्या औषधांचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला असण्याची शक्यता आहे. प्रज्ञा ठाकूर यांची प्रकृती सध्या ठीक असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. जास्त क्षमतेची औषधं घ्यावी लागत असल्यानं प्रज्ञा ठाकूर सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहणं टाळतात.
भाजप कार्यालयातील कार्यक्रमादरम्यान खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या प्रकृतीत बिघाड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 11:38 AM
भोपाळमधील कार्यक्रमादरम्यान तब्येतीत अचानक बिघाड
ठळक मुद्देभाजपा कार्यालयात कार्यक्रमासाठी गेलेल्या ठाकूर यांची प्रकृती बिघडलीसध्या ठाकूर यांची प्रकृती ठीक; वैद्यकीय पथक तपासणीसाठी घरी पोहोचलंउच्च क्षमतेच्या औषधांचा परिणाम झाल्याची शक्यता