हरिद्वार - आपल्या विधानांमधून नेहमी वाद ओढवून घेणाऱ्या साक्षी महाराजांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. साक्षी महाराज यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केलं आहे. ममता बॅनर्जी या राक्षस हिरण्यकश्यपूच्या कुटुंबातील असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच ‘जय श्री राम’चा नारा दिल्यावर ममता बॅनर्जी तुरूंगात पाठवायची भाषा करतात. असे तर राक्षस हिरण्यकश्यपू करायचा असं साक्षी महाराजांनी म्हटलं आहे.
साक्षी महाराज यांनी 'पश्चिम बंगालचं नाव ऐकताच मला त्रेता युगाची आठवण होते. जेव्हा राक्षस राज हिरण्यकश्यपूने ‘जय श्री राम’ म्हणण्यावरुन आपल्या मुलाला तुरुंगात टाकलं, त्याला अनेक प्रकारच्या यातना दिल्या. बंगालमध्ये ममता बॅनर्जीही असंच करत आहेत. ‘जय श्री राम’ म्हणण्यावरुन त्या लोकांना तुरुंगात टाकत आहेत. ममता या हिरण्यकश्यपूच्या कुटुंबातील तर नाही ना?' असं म्हटलं आहे.
साक्षी महाराज यांना भाजपाने पुन्हा एकदा उन्नाव लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी दिली होती. त्यावेळी प्रचारादरम्यान मतदारांना संबोधित करताना साक्षी महाराज यांनी वादग्रस्त विधान केले होते. मला मतदान करा अन्यथा मी माझी सर्व पापं तुमच्या पदरात टाकेन, तुम्हाला शाप देईन, अशी भीती साक्षी महाराज यांनी मतदारांना दाखवली होती. साक्षी महाराज यांनी वादग्रस्त विधान करण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीसुद्धा साक्षी महाराज यांनी राम मंदिर, प्रियंका गांधी यांच्याबाबतही वादग्रस्त विधाने केली आहेत.
'जय श्री राम' लिहलेले 10 लाख पोस्टकार्ड ममतांना पाठवणार : भाजपालोकसभा निवडणुकीत सर्वधिक चर्चेत आलेला पश्चिम बंगाल हे राज्य अजूनही राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू बनलेला आहे. पश्चिम बंगालमध्ये 'जय श्री राम' ह्या घोषणांमुळे राजकीय वातावरण तापत आहे. 'जय श्री राम'च्या घोषणा देणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर मुख्यमंत्री ममता बनर्जी भडकल्या असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यांनतर भाजपच्या 10 कार्यकर्त्यांवर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आले होते. त्याला उत्तर देत भाजपाकडून 'जय श्री राम' लिहलेले 10 लाख पोस्टकार्ड ममतांना पाठवले जाणार असून त्याची तयारी सुरु झाली असल्याची माहिती भाजपा खासदार अर्जुन सिंह यांनी दिली.
पश्चिम बंगालमध्ये 'जय श्री राम'च्या घोषणांमुळे राजकीय युद्ध सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. पश्चिम बंगालच्या चंद्रकोण येथून ममता यांचा ताफा जात असताना भाजप कार्यकर्त्यांनी 'जय श्रीराम' अशा घोषणा दिल्या होत्या. या घोषणा ऐकताच ममतांनी गाडी थांबवली. त्या गाडीतून उतरून बाहेर आल्या आणि ही घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर भडकल्या होत्या. यावेळी पोलिसांनी भाजपाचे 10 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर भाजप ही आता आक्रमक झाली असून ममता बनर्जी यांना 10 लाख 'जय श्री राम' लिहलेले पोस्टकार्ड पाठवणार आहे. त्याची तयारी सुद्धा झाली असल्याचा खुलासा अर्जुन सिंह यांनी केला आहे.